Sunday, September 13, 2026
Homeफलटणगायकवाड परिवाराच्या निवासस्थानी मंगलमय परित्राण पाठधम्मश्रवणासोबत धम्माचरण हाच सुगतीचा मार्ग - आयु....

गायकवाड परिवाराच्या निवासस्थानी मंगलमय परित्राण पाठधम्मश्रवणासोबत धम्माचरण हाच सुगतीचा मार्ग – आयु. सोमीनाथ घोरपडे

गायकवाड परिवाराच्या निवासस्थानी मंगलमय परित्राण पाठ
धम्मश्रवणासोबत धम्माचरण हाच सुगतीचा मार्ग – आयु. सोमीनाथ घोरपडे
फलटण : आयु. राजेंद्रकुमार गायकवाड व त्यांच्या सहचारिणी आयुनि छाया राजेंद्रकुमार गायकवाड यांच्या निवासस्थानी वर्षावासाच्या पवित्र काळात मंगलमय परित्राण पाठाचा विधी श्रद्धा, धम्मनिष्ठा आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. नालासोपारा, मुंबई येथील पूज्य भंते कश्यप यांच्या उपस्थितीत परित्राण पाठ व धम्मदेशना झाली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक यांच्या वतीने संपूर्ण सूत्रपठण करण्यात आले. बुद्धवाणीच्या मंगलमय पठणाने गायकवाड परिवाराचा निवास धम्ममय वातावरणाने भारून गेला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्याचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी धम्मप्रवचन केले. गृहस्थ जीवनामध्ये बौद्ध धम्माचे आचरण किती महत्त्वाचे आहे, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले. “धम्म केवळ ऐकण्याचा किंवा बोलण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी सम्राट अशोकाच्या जीवनातील परिवर्तनाचा दाखला दिला.
कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या जीवनात झालेला परिवर्तनाचा प्रवास स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, धम्माच्या प्रभावातून हिंसेपासून करुणेकडे, विजयाच्या अहंकारापासून धम्मविजयाकडे आणि राजसत्तेपासून लोककल्याणाकडे त्यांचा प्रवास झाला. त्यामुळे धम्माचे सामर्थ्य व्यक्तीच्या अंतर्मनात परिवर्तन घडवून आणण्यात आहे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारण्यामागील त्यांचा व्यापक सामाजिक व मानवी दृष्टिकोन यावरही आयु. घोरपडे यांनी भाष्य केले. जीवनात सुगती साधायची असेल तर धम्मश्रवणासोबत धम्माचरण, सदाचार आणि कुशल कर्म आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. धम्मगुरूंचा सन्मान करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून स्वतःच्या आचरणात परिवर्तन घडवणे ही प्रत्येक गृहस्थाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्मविपाकाच्या सिद्धांताचे विवेचन करताना त्यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या कर्म आणि त्याच्या परिणामांच्या नैसर्गिक नियमाकडे लक्ष वेधले. महापरिनिर्वाणाच्या परंपरागत कथांमध्ये महामोग्गल्लान स्थविरांच्या मृत्यूचा संदर्भ देताना त्यांनी कर्मविपाकाचा विचार स्पष्ट केला. या कथांचा अर्थ अंधश्रद्धेने न घेता कर्माच्या नैतिक परिणामांचा धम्मदृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
“भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे स्वचित्ताची शुद्धी आणि आपल्या मनावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या रचनांमधील मनाच्या शुद्धतेशी संबंधित विचारांचा संदर्भ दिला. मन शुद्ध झाले तर आचार शुद्ध होतो आणि आचार शुद्ध झाला तर व्यक्तीचे जीवन व समाजजीवनही मंगलमय होते, असा संदेश त्यांनी दिला.
गायकवाड परिवाराने वर्षावासाच्या पवित्र काळात आपल्या निवासस्थानी परित्राण पाठाचे आयोजन करून कुशल कर्म केले, याबद्दल त्यांनी परिवाराप्रती मंगलकामना व्यक्त केल्या. बुद्धबल, धम्मबल आणि संघबलाने गायकवाड परिवारास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि मंगलमय जीवन लाभो, अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.

परित्राण पाठ अंधश्रद्धा नसून धम्मस्मरणाची प्रक्रिया – पूज्य भंते कश्यप
यावेळी पूज्य भंते कश्यप यांनी परित्राण पाठाचे महत्त्व स्पष्ट केले. परित्राण पाठामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून बुद्धवचनांचे श्रवण, मनन, चित्तशुद्धी आणि कुशल आचरणाची प्रेरणा याला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
“धम्मश्रवणासोबत धम्माचरण केले तरच धम्माचा खरा लाभ होतो. जीवनातील प्रत्येक कृतीला तिच्या स्वरूपानुसार परिणाम प्राप्त होतो. म्हणून प्रत्येकाने कुशल कर्म करण्याचा प्रयत्न करावा,” असा संदेश त्यांनी दिला.
धम्मदान हे श्रेष्ठ दान असून धम्मदानाची भावना आणि धम्माचरणातून निर्माण होणारे कुशल कर्म व्यक्तीच्या जीवनाला मंगल दिशेने घेऊन जाते, असेही भंते कश्यप यांनी स्पष्ट केले. निसर्गातील कारण-परिणामाच्या नियमाशी कर्मविपाकाच्या सिद्धांताचा संबंध स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांना नियमित धम्मश्रवण, चिंतन आणि आचरण करण्याचे आवाहन केले.
पूज्य भंते कश्यप यांच्या मधुर आणि प्रभावी स्वरातील बुद्धवचनांच्या पठणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि धम्ममय झाले.
मान्यवरांची उपस्थिती
या मंगल प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी/निरीक्षक आणि समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले उपस्थित होते.
परित्राण पाठ विधीचे संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव व माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले.
यावेळी माजी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड, आयु. अमोल भोसले, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, माजी संघटक आयु. आनंद जगताप, बौद्धाचार्य धम्मसेवक आयु. संजय घोरपडे, समता सैनिक दलाचे माजी जनरल व गायक आयु. लक्ष्मण निकाळजे, संपूर्ण रणवरे परिवार, तालुका पदाधिकारी तथा बौद्धाचार्य आबा भोसले, अजय निकाळजे, विजय निकाळजे, संबुद्ध भालेराव, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि भाग्यश्री गायकवाड, आयुनि कल्पना भालेराव, आयुनि अश्विनी मोरे, आयुनि योगिता घोरपडे, आयुनि भाग्यश्री निकाळजे, आयुनि रजनी निकाळजे, समिधा घोरपडे, नीलाक्षी जगताप यांच्यासह शीलसंपन्न श्रद्धावान उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गायकवाड परिवाराने आयोजित केलेल्या या परित्राण पाठामुळे निवासस्थानी बुद्धवाणीचा मंगल स्वर निनादला आणि उपस्थितांना धम्मश्रवण, चिंतन व आचरणाचा प्रेरणादायी संदेश मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments