फलटणमध्ये उद्या तालुकास्तरीय जनता दरबार; नागरिकांच्या शासकीय प्रश्नांना मिळणार थेट न्याय
फलटण प्रतिनिधी : नागरिकांचे विविध शासकीय प्रश्न, प्रलंबित तक्रारी आणि अडचणींचे निराकरण करण्यासाठी फलटण येथे सोमवार, दि. ७ रोजी तालुकास्तरीय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार महाराजा मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या जनता दरबाराला आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी थेट उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पोलीस, महसूल, नगरपालिका, आरोग्य, कृषी, वीज, पाणीपुरवठा तसेच विविध शासकीय योजना आणि अन्य विभागांशी संबंधित प्रश्न व तक्रारी नागरिकांना या जनता दरबारात मांडता येणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधून शासकीय कामकाजातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने आणि आवश्यक संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
