भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरासाठी कमी नजराणा भरल्याचा आरोप; तिघांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
फलटण : प्रतिनिधी — जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील मौजे कोळकी येथील गट क्रमांक ७९/१/१, ७९/१/५ आणि ८०/१ या जमिनींच्या भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्जदार रणधीर धनसिंगराव भोईटे यांनी फलटण तहसील कार्यालयात अर्ज सादर केला होता.
या अर्जासोबत सह दुय्यम निबंधक वर्ग-२, फलटण यांच्या कार्यालयाचा असल्याचे दर्शविणारा मूल्यांकन दाखला जोडण्यात आला होता. या दाखल्याच्या आधारे शासनाकडे कमी नजराणा रक्कम भरण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आला. चौकशीदरम्यान तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेला मूल्यांकन दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये रणधीर धनसिंगराव भोईटे, निखिल रामदास देवकर, प्रवीण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि वीरेंद्र विक्रम झांजुर्णे यांचा समावेश आहे.
गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी रणधीर भोईटे, राजेंद्र कापसे आणि विक्रम झांजुर्णे या तिघांना अटक केली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात बनावट दस्तऐवज कोणी तयार केला, तो तहसील कार्यालयात सादर करण्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती, शासनाचा किती महसूल बुडविण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.
