Monday, August 17, 2026
Homeफलटणनिरगुडी येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व ‘तक्षशिला बुद्ध विहार’ नामकरण सोहळा उत्साहात

निरगुडी येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व ‘तक्षशिला बुद्ध विहार’ नामकरण सोहळा उत्साहात

निरगुडी येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व ‘तक्षशिला बुद्ध विहार’ नामकरण सोहळा उत्साहात

निरगुडी येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व ‘तक्षशिला बुद्ध विहार’ नामकरण सोहळा उत्साहात

निरगुडी, ता. फलटण : मौजे निरगुडी येथे भारतीय बौद्ध महासभा व सिद्धार्थ तरुण मंडळ, निरगुडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि नूतन बुद्ध विहाराच्या नामकरणाचा धम्ममंगल सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. नूतन बुद्ध विहाराचे ‘तक्षशिला बुद्ध विहार’ असे नामकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्धमूर्तीची गावातून शांततामय धम्मरॅली काढण्यात आली. दोन-दोनच्या रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीमध्ये ‘बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि’ या त्रिशरणाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला.

यानंतर नूतन बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे ‘तक्षशिला बुद्ध विहार’ असे नामकरण करण्यात आले. भंते कश्यपजी यांच्या हस्ते बौद्ध संस्कार पद्धतीनुसार बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भव्य सभामंडपात भंते कश्यपजी यांनी धम्मदेशना दिली.

अधिष्ठानातून धम्मविचार जागवण्याचे आवाहन
आपल्या धम्मदेशनेत भंते कश्यपजी यांनी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आणि विहाराचे अधिष्ठान हे केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित न ठेवता त्यातून धम्मविचार, नैतिकता, विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर झाला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अनित्यतावादाच्या सिद्धांताचे विवेचन करताना त्यांनी नंदाच्या जीवनप्रवासाचा दाखला दिला. जगातील सर्व गोष्टी अनित्य आहेत आणि जीवनात परिवर्तन अटळ आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अधिष्ठान आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणीही सांगितली. बडोदा येथील नोकरीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आलेल्या सामाजिक अपमानाच्या अनुभवाचा संदर्भ देत, त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी जीवन समर्पित करण्याचा घेतलेला संकल्प आणि त्यानंतर त्या अधिष्ठानाची केलेली पूर्तता यावर प्रकाश टाकला. व्यक्तिगत दुःखाचे रूपांतर सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पात कसे करता येते, याचा प्रेरणादायी आदर्श बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो, असे त्यांनी सांगितले.

निरगुडी येथे धम्मकार्याची नवी सुरुवात करण्याचे आवाहन
समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी निरीक्षक तथा राज्य संघटक आयु. दादासाहेब भोसले सर यांनी निरगुडीतील बौद्ध उपासक-उपासिकांना शुभेच्छा देत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून निरगुडी येथे विविध धम्मशिबिरे व उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. भारतीय बौद्ध महासभा सातत्याने करीत असलेल्या धम्मकार्याची तसेच आंबेडकर घराण्याच्या धम्मकार्याची माहिती देत, निरगुडी येथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करून नियमितपणे धम्मकार्य पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

निरगुडीच्या योगदानाचा गौरव
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी फलटण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना होण्यामध्ये निरगुडी गावाचे असलेले योगदान अधोरेखित केले. निरगुडीतील बौद्ध उपासक-उपासिकांनी धम्मकार्याला दिलेल्या आर्थिक व सामाजिक योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

बुद्धमूर्ती उपलब्ध करून देण्यामध्ये आयु. तुषार मोहिते साहेब यांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी नमूद केली. तसेच आगामी काळात धम्माचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी नियमित धम्मकार्य, शिबिरे व विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यामागे निरगुडीतील ज्येष्ठ तसेच युवा कार्यकर्त्यांचे योगदान आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी पदाधिकाऱ्यांचे मिळालेले सहकार्य यामुळे हा सुंदर धम्ममंगल सोहळा साकार झाला, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती व शुभेच्छा
कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, फलटण पंचायत समितीचे उपसभापती तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकारांनी संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहून या धम्ममंगल कार्यास सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले.

यावेळी केंद्रिय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते सर, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर व अमोल भोसले सर, संघटक राजेंद्र कुमार गायकवाड सर, विजयजगताप सर व आनंद जगताप सर, माण तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्य तथा पदाधिकारी आबा भोसले, धम्म मित्र अजय निकाळजे, विजय निकाळजे,गणपत सस्ते,दिपक सस्ते, राजेंद्र सस्ते,जालिंदर सस्ते, हणमंत गायकवाड, गणेश सस्ते,युवराज सस्ते,सचिन सस्ते,धनाजी लकडे,महेंद्र गोरे,महादेव गोरे,संदीप खवळे,महेश गायकवाड, तानजी गोरे,निरगुडी येथील सिध्दार्थ तरुण मंडळाचे सर्व दशरथ सोनवणे, सदाशिव बनसोडे, कोंडीराम हुंबरे, पिंटु सोनवणे, किशोर सोनवणे, सचिन सोनवणे,विकास सोनवणे, नाना सोनवणे,पप्पू सोनवणे, माणिक सोनवणे, चिमाजी सोनवणे, मोहन सोनवणे,महादेव बनसोडे, बंडु बनसोडे, राहुल बनसोडे, शेखर सोनवणे, मारुती सोनवणे,योगेश सोनवणे, संदीप हुंबरे,शांताराम सोनवणे,जगन्नाथ सोनवणे,सुनिल हुंबरे,दत्ता बनसोडे, वैभव लोंढे,शांताराम बनसोडे,कार्यकर्ते, BBM Family, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्धमूर्तीचे दाते अप्पर/सह आयकर आयुक्त आयु. तुषार मोहिते साहेब यांनी या मंगल सोहळ्यास शुभेच्छा पाठवून निरगुडीतील धम्मकार्याला शुभेच्छा दिल्या. बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना, ‘तक्षशिला बुद्ध विहार’चे नामकरण आणि धम्मदेशनेमुळे निरगुडी परिसरात दिवसभर मंगलमय व धम्ममय वातावरण निर्माण झाले. नूतन बुद्ध विहार हे केवळ उपासनेचे केंद्र न राहता धम्म, प्रबोधन, समता आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments