
मानसिक तणावाचा शरीर आणि मनावर गंभीर परिणाम; व्यायाम, ध्यान, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करण्याचे आवाहन
फलटण | प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताण-तणाव (Stress) ही प्रत्येक वयोगटासमोरील गंभीर समस्या बनली आहे. वैयक्तिक आयुष्य, नोकरी, व्यवसाय, करिअर, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक अपेक्षा यांचा समतोल साधताना अनेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः “वर्क-लाईफ बॅलन्स” राखण्यात येणाऱ्या अडचणींमुळे मानसिक थकवा वाढत असून त्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावरही होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास शरीरातील कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाइप-२ मधुमेह, छातीत दुखणे, चिंता, नैराश्य, ऍसिडिटी, स्नायूंचे विकार तसेच स्मरणशक्ती कमी होण्यासारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
तणावाचे मुख्यतः दोन प्रकार मानले जातात. तीव्र (Acute) तणाव हा अल्पकाळ टिकणारा असतो आणि त्यामागील कारण दूर झाल्यानंतर कमी होतो. तर दीर्घकालीन (Chronic) तणाव हा अनेक आठवडे किंवा महिने टिकतो आणि त्याचे परिणाम संपूर्ण शरीर व मनावर गंभीर स्वरूपात दिसून येतात.
तणावाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी कामाशी संबंधित आणि वैयक्तिक जीवनातील तणाव यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन, जबाबदाऱ्यांची स्पष्टता आणि आवश्यक तेथे ठामपणे “नाही” म्हणण्याची सवय ही महत्त्वाची जीवनकौशल्ये असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
विशेषतः चाळीशी ते पन्नाशी या वयोगटात मुलांचे शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि करिअरमधील वाढत्या अपेक्षा यामुळे तणावाचे प्रमाण अधिक वाढत असल्याचेही निरीक्षण आहे.
तणाव कमी करण्यासाठी दररोज काही सोप्या सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरू शकते. मन अस्वस्थ वाटत असल्यास डोळे मिटून शांतपणे खोल श्वास घेणे आणि सोडणे, दिवसातून किमान दहा मिनिटे ध्यानधारणा करणे, नियमित चालणे किंवा योगासने करणे, झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल व टीव्हीपासून दूर राहणे, आवडते छंद जोपासणे आणि पुरेशी झोप घेणे यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल असे नसते. त्यामुळे जे बदलता येत नाही ते स्वीकारणे, वर्तमानात जगणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे तणाव कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी सूत्र मानले जाते. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.









