
भर बाजारात पथदिव्याचा खांब कोसळून शेतकरी जखमी; माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व उपनगराध्यक्षा भोसले यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी
फलटण | प्रतिनिधी :- फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे फलटण नगर परिषदेच्या विरोधी गटातील सर्व नगरसेवक एकत्र आले त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे नेते निलेश तेलखडे यांनी फलटण नगर परिषदेने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारलेल्या नवीन विद्युत पथदिवा प्रकल्पावर गंभीर आरोप केले.
तेलखडे म्हणाले की, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शहरात नवीन पथदिवे बसविण्यात आले. अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि उपनगराध्यक्षा भोसले मॅडम यांनी मोठा गाजावाजा करत या पथदिव्यांचे उद्घाटन केले होते. त्यावेळी “यापूर्वी कधीही झाला नाही असा विकास करून दाखविला” असा दावा करण्यात आला होता. मात्र आज या पथदिव्यांची अवस्था पाहता त्या दाव्याला कोणताही आधार उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, भर बाजारात पथदिव्याचा खांब कोसळून तेथे बसलेल्या शेतकरी व भाजी विक्रेत्यांवर पडला. या दुर्घटनेत एका शेतकऱ्याच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. या घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण शहराच्या विकासासाठी ७० ते ८० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले जाते. मग हा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करत तेलखडे यांनी पथदिवा कामामध्ये “२० टक्के कमिशनखोरी झाली असून त्यामुळेच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले,” असा गंभीर आरोप केला.
तेलखडे यांनी पुढे सांगितले की, पालखी प्रस्थानावेळी एका गाढवाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाला. त्या ठिकाणी एखादा वारकरी असता तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय, फलटण एसटी स्थानकासमोर एसटी बसच्या धडकेमुळे एक पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटना पथदिवा कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि उपनगराध्यक्षा भोसले मॅडम हे या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारणार आहेत का? असा थेट प्रश्न उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जखमी नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निलेश तेलखडे यांनी केली.










