
दोन ते तीन भाजी विक्रेते जखमी; सलग दुर्घटनांमुळे पालखी मार्गावरील विद्युत रोषणाईच्या कामाच्या दर्जा व सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या पालखी मार्गावरील विद्युत पथदिव्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर घटना घडली असून भर बाजाराच्या दिवशी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी शासकीय विश्रामगृहासमोरील विद्युत पथदिवा एका वाहनाला अडकलेल्या दोरीमुळे अचानक कोसळला. यावेळी बाजारात भाजी विक्रीसाठी बसलेल्या दोन ते तीन विक्रेत्यांवर खांब पडल्याने त्यांना दुखापत झाली. सुदैवाने खांब थेट डोक्यावर न पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे आणि विशाल तेली व संदीप चोरमले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत नगर परिषदेचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पडलेला खांब हटविणे, परिसर सुरक्षित करणे, वाहतूक सुरळीत करणे तसेच जखमी नागरिकांना मदत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे, पालखी मार्गावरील विद्युत पथदिव्यांबाबत ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वी फलटण एसटी स्थानकासमोर एसटी बसचा धक्का लागून एक विद्युत पथदिवा कोसळला होता. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर विद्युत पुरवठ्यासाठी बसविण्यात आलेल्या बॉक्सला विजेचा धक्का लागून एका गाढवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे विद्युत सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
आता पुन्हा भर बाजारात पथदिवा कोसळल्याने पालखी मार्गावरील विद्युत रोषणाईच्या कामाच्या दर्जाबाबत तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे काम दर्जेदार पद्धतीने झाले आहे का, सुरक्षिततेचे सर्व निकष पाळण्यात आले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अपघातात जखमी झालेल्या भाजी विक्रेत्यांच्या उपचाराचा खर्च कोण उचलणार, त्यांना नुकसानभरपाई मिळणार का, तसेच संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जखमींना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पालखी मार्गावरील सर्व विद्युत पथदिव्यांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










