कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत, पोलीस वाहनाला बांधून धिंड काढली

0
22
कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत, पोलीस वाहनाला बांधून धिंड काढली

कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत, पोलीस वाहनाला बांधून धिंड काढली

पुणे | प्रतिनिधी :- पुण्यातील कात्रज परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.

मृत तरुणाचे नाव गणेश रविंद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा आपल्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून काही युवकांनी त्याचा रस्ता अडवून त्याच्यावर कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेशला तातडीने भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत चार संशयित आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या हत्येप्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना, पोलिसांनी आरोपींना पोलीस वाहनाला बांधून परिसरातून धिंड काढली. या कारवाईची परिसरात मोठी चर्चा असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांकडून या हत्येमागील नेमके कारण, जुन्या वादाचे स्वरूप आणि इतर आरोपींचा सहभाग याचा अधिक तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.