Tuesday, September 1, 2026
Homeफलटणचांदोबाचा लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पहिले भव्य 'उभे रिंगण';...

चांदोबाचा लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पहिले भव्य ‘उभे रिंगण’; हरिनामाच्या गजरात लाखो वारकऱ्यांचा भक्तिमय जल्लोष

चांदोबाचा लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पहिले भव्य ‘उभे रिंगण’; हरिनामाच्या गजरात लाखो वारकऱ्यांचा भक्तिमय जल्लोष

फलटण | प्रतिनिधी. महाराष्ट्राच्या वैभवशाली वारकरी परंपरेचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिले भव्य ‘उभे रिंगण’ शुक्रवारी फलटण तालुक्यातील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. टाळ-मृदंगाचा निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लाखो वारकरी आणि भाविकांनी या नेत्रदीपक सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होत भक्तीचा अद्वितीय अनुभव घेतला.

लोणंद येथील दीड दिवसांचा मुक्काम पूर्ण करून पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश केला. कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे तालुक्याच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, अभिजित नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि हजारो भाविक उपस्थित होते.

दुपारच्या सुमारास पालखी सोहळा चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर परंपरेनुसार उभ्या रिंगणाची तयारी सुरू झाली. वारकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रांगा लावल्या. वातावरणात भक्ती, उत्साह आणि अनुशासनाचा सुंदर संगम पाहायला मिळत होता.

रथापुढील सत्तावीस दिंड्यांमधून माऊलींचा पवित्र अश्व वेगाने धावत आला. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर हा अश्व मागील दिंड्यांपर्यंत धावत गेला आणि पुन्हा माघारी परतला. त्यानंतर माऊलींचा मुख्य अश्व आणि स्वारीचा अश्व यांनी केलेली वेगवान दौड पाहून उपस्थित भाविकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.

रिंगणादरम्यान वारकऱ्यांनी सादर केलेले भारूड, अभंग आणि भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या अखंड गजरात प्रत्येक वारकरी भक्तिभावाने तल्लीन झालेला दिसत होता.

माऊलींच्या रथाजवळ दोन्ही अश्वांचे आगमन झाल्यानंतर सोहळा प्रमुखांच्या हस्ते अश्वांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नैवेद्य दाखवून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा अश्वांनी वेगवान आणि शिस्तबद्ध दौड पूर्ण करत उभ्या रिंगणाचा परमोच्च क्षण साकारला.

या वेळी अश्वांच्या पायाखालची पवित्र धूळ कपाळी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ही धूळ प्रसाद मानून भाविकांनी भक्तिभावाने स्वीकारली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या लाखो वारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला.

पहिले उभे रिंगण यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी तरडगाव येथील मुख्य पालखी तळाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी तेथे पालखीचा विसावा झाला. फलटण तालुक्यातील या ऐतिहासिक उभ्या रिंगणाने यंदाच्या आषाढी वारीत भक्ती, शिस्त, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments