Tuesday, August 25, 2026
Homeसातारापालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

सातारा | प्रतिनिधी :- आषाढी वारीनिमित्त सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना व्यापक नियोजन करून भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, दळणवळण, अन्नसुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

पालखी मार्गावर आरोग्यविषयक कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यास तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी निश्चित रुग्णालयांची पूर्वनियोजन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा संख्येने रुग्णवाहिका, प्रशिक्षित वैद्यकीय पथके आणि आवश्यक औषधसाठा सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी पालखीच्या संपूर्ण मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता संबंधित यंत्रणांनी सातत्याने देखरेख ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.

यंदा पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत सुमारे 1,400 बस फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. या सर्व बसेस स्वच्छ, सुस्थितीत आणि सुरक्षित असाव्यात, तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

वारीदरम्यान मोबाईल व दूरसंचार सेवा अखंडित राहण्यासाठी भारत संचार निगम (बीएसएनएल) यांनी आवश्यक तांत्रिक व्यवस्था करून संपूर्ण मार्गावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाने पालखी मार्गावरील हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांकडून विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची नियमित तपासणी करून दर्जेदार व सुरक्षित अन्नच भाविकांना उपलब्ध होईल, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि इतर संबंधित विभागांनी वारीतील १६ प्रमुखांशी सातत्याने संपर्क ठेवून समन्वयाने काम करावे. पालखी सोहळा भक्तीमय, आनंदी, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षतेने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments