फलटण नगरपरिषद विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; ‘रामराजे उद्यान’ नामांतरावर रंगली जोरदार चर्चा

0
8
फलटण नगरपरिषद विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; ‘रामराजे उद्यान’ नामांतरावर रंगली जोरदार चर्चा

फलटण नगरपरिषद विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; ‘रामराजे उद्यान’ नामांतरावर रंगली जोरदार चर्चा

फलटण | प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन एकूण २१ विषयांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सगुणामाता नगर येथील ‘रामराजे उद्यान’चे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ करण्याच्या प्रस्तावावर सर्वाधिक चर्चा रंगली.

सगुणामाता नगर परिसरातील साई मंदिरासमोरील ‘रामराजे उद्यान’चे नामांतर करून ‘संत सगुणामाता उद्यान’ असे नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवक अशोक जाधव यांनी मांडला. प्रस्तावाचे वाचन सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी केले, तर नगरसेवक किरण राऊत यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव उद्यानाला देण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने खाजगी संस्थांमध्ये विविध उपक्रम सुरू असल्याचे सांगत, सरकारी उद्यानाला संत सगुणामाता यांचे नाव देण्यास कोणताही विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली.

सभेदरम्यान शहरातील अतिक्रमणाचा मुद्दाही जोरदार चर्चेत आला. नगरसेवक पंकज पवार यांनी अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित करताच नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला. पुढील सभेपूर्वी अतिक्रमण हटविण्याची प्रभावी कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अखेरीस संबंधित भूखंड मालकांना नोटीस देऊन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात येतील. आदेशाचे पालन न झाल्यास नगरपरिषद स्वतः स्वच्छता करून त्याचा खर्च संबंधित मालकांच्या करामध्ये समाविष्ट करेल, असा निर्णय घेण्यात आला.

पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरही सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. तसेच आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन बारी, हिरकणी कक्ष, स्वच्छता व्यवस्था आणि इतर आवश्यक कामांसह १९ विकासकामांना सभेत मंजुरी देण्यात आली.

सभेत शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसही मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान येथे निवारा शेड उभारणे तसेच कुरेशी नगर परिसरातील विकासकामांनाही हिरवा कंदील देण्यात आला.

याशिवाय शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन जुने हातपंप दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल घेणे, गोळीबार मैदान परिसरात पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे तसेच काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देशही सभेत देण्यात आले.

दरम्यान, विरोधी गटातील स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण सभेत कोणत्याही विषयावर भाष्य न केल्याने त्यांच्या शांत भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. :::