
फलटण | प्रतिनिधी पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह भाषा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यामार्फत नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याच्या आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून काही पत्रकार खासदार संजय दिना पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असता, त्यांनी पत्रकारांशी कथितपणे अर्वाच्च भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, खासदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा असताना पोलिसांच्या उपस्थितीतच कथित धमकी देण्यात आल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच, यापूर्वीही स्वतःकडे बॉम्ब असल्याचे तसेच हिंसक स्वरूपाची विधाने केल्याचे कथित प्रकार समोर आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असून, त्या सर्व वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात अरविंद मेहता, अजय माळवे, यशवंत खलाटे, सुभाष भांबुरे, युवराज पवार, नासिर शिकलगार, पोपट मिंड, विनायक शिंदे, अॅड. रोहित अहिवळे, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सचिन मोरे, विशाल शहा, मितेश खराडे, अभिजित सरगर, दीपक मदने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, वैभव गावडे, प्रशांत रणवरे, संजय गायकवाड, वैभव जगताप, बाळासाहेब ननवरे, शेखर जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.










