
फलटण | प्रतिनिधी
धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांची सुंदर सांगड घालत फलटण शहरातील प्रभाग क्र. ११ मध्ये यंदाची वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पारंपरिक वटपूजनासोबतच ‘एक महिला – एक वृक्ष’ या सामाजिक उपक्रमाद्वारे महिलांना वृक्षारोपणाचा संकल्प देण्यात आला.
फलटण नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले यांच्या पुढाकारातून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने परिसरातील शेकडो विवाहित महिलांचा विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.
यावेळी संदीप चोरमले यांनी सांगितले की, वटवृक्षाची पूजा करण्याबरोबरच प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे ही आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद नगर तसेच नारळी बाग येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास सौ. स्वाती चोरमले, सौ. सोनाली बेडके, विक्रमसिंह शितोळे, अमित बेडके, सिद्धिविनायक गणेश मंदिराचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, चंद्रकांत दाणी, दिलीप राक्षे, आप्पासाहेब कापसे, दिलीप क्षिरसागर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळवल्याच्या स्मरणार्थ वटपौर्णिमा साजरी केली जाते. या पौराणिक परंपरेला आधुनिक काळातील पर्यावरण संवर्धनाची जोड देत महिलांनी निसर्गरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, मिळालेली वृक्षांची रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. धार्मिक उत्सवातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.










