Tuesday, August 11, 2026
Homeफलटणफलटणमध्ये खाजगी सावकारीचे जाळे वाढल्याची चर्चा; नव्या डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे...

फलटणमध्ये खाजगी सावकारीचे जाळे वाढल्याची चर्चा; नव्या डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान

फलटण | प्रतिनिधी. फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचे वाढते जाळे चिंतेचा विषय बनत असून, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे देण्याचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून काही खाजगी सावकारांनी तालुक्यात आपले मजबूत जाळे निर्माण केले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी, शेतमजूर तसेच गरजू नागरिक यांना मोठ्या व्याजदराने कर्ज दिले जात असल्याचे सांगितले जाते. कर्जाची रक्कम किंवा व्याज वेळेत न भरल्यास संबंधित कर्जदारांना मानसिक त्रास, धमक्या आणि विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत आहेत.

दरम्यान, वाठार निंबाळकर येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर खाजगी सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्जाच्या तणावातून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील अवैध सावकारी व्यवहारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती आणि राजकीय पाठबळ असलेल्या घटकांचा या व्यवसायाशी संबंध असल्याच्या चर्चाही स्थानिक स्तरावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांवर कारवाई करताना प्रशासनासमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून, खाजगी सावकारी, अवैध व्याजव्यवहार आणि कर्जदारांच्या छळाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सावकारीच्या वाढत्या विळख्यातून नागरिकांची सुटका करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभे आहे.

विशेष म्हणजे, फलटण तालुक्यातील अनेक सावकारांनी मोठे जाळे उभे केल्याची चर्चा असून, या कथित सावकारांची नावे आणि त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती लवकरच जनतेसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments