लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

0
10
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

पुणे | प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात नियोजित हत्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे पुण्यासह व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. प्रारंभी हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या घटनेमागे मोठे षड्यंत्र असल्याचे निष्पन्न झाले.

केतन अग्रवाल यांचे लग्न लवकरच होणार होते. या विवाहासाठी जयपूर येथे तब्बल १७ कोटी रुपये खर्च करून आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगड किल्ल्यावर गेला होता.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूमागे त्याची होणारी पत्नी आणि तिचा जवळचा मित्र यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. पुढील चौकशीत ही घटना अपघात नसून नियोजित हत्येचा कट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केतनच्या होणाऱ्या पत्नीसह तिच्या कथित प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या हत्येमागील नेमके कारण आणि कटाचा संपूर्ण तपशील उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले असून, केतन अग्रवाल यांच्या मृत्यूचे गूढ उलगडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.