
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे डीवायआरटीओ सचिन विधाते यांचा फलटण प्रतिनिधी संघटनेतर्फे सत्कार
फलटण | प्रतिनिधी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण येथे श्री. सचिन विधाते यांची डी.वाय.आर.टी.ओ. (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) पदावर पदोन्नती होऊन फलटण येथे नियुक्ती झाल्याबद्दल फलटण प्रतिनिधी संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी फलटण शहराला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचेही उपस्थितांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. फलटण शहर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, परवाना नूतनीकरण तसेच इतर परिवहनविषयक सेवांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात फलटण प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक, भाजप पदाधिकारी व युवा उद्योजक श्री. अमोलजी सस्ते यांनी आरटीओ कार्यालयाच्या कार्यपद्धती, वाहनधारकांसाठी आवश्यक नियम, शासकीय सेवा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
तसेच श्री. सनी पवार यांनी फलटण प्रतिनिधी संघटनेची ओळख करून देत संघटनेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. संघटनेच्या वतीने विविध मागण्या आणि सूचना यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास फलटण प्रतिनिधी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच फलटण शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने रुजू झालेल्या डीवायआरटीओ श्री. सचिन विधाते यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व सकारात्मक राहिले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










