एन. रघुरामन यांचा कॉलम: एआय माणसांच्या ‘ड्युरेबल स्किल्स’ची नक्कल कधीच करू शकत नाही

0
1
एन. रघुरामन यांचा कॉलम:  एआय माणसांच्या ‘ड्युरेबल स्किल्स’ची नक्कल कधीच करू शकत नाही




मी जितका जास्त रुग्णालयांमध्ये जातो तितकाच माझा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा मी रुग्ण आणि परिचारिका यांच्यातील संवाद पाहतो तेव्हा मला त्यात एक वेगळेच कौशल्य दिसते. त्यांच्यात एकमेकांची देहबोली समजून घेण्याची क्षमता असते. न बोललेल्या गोष्टींचा अर्थ सहज समजून घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. हे पाहून माझा विश्वास अधिक दृढ होतो की हे गुण पूर्णपणे मानवी आहेत. किमान सध्या तरी मशीन्स या गुणांच्या आसपासही पोहोचू शकत नाहीत. एआयच्या वाढत्या वापरामुळे मशीन्स आपली जागा घेतील, अशी भीती वाटणाऱ्या सर्वांसाठी हा लेख आहे. ‘जॉब्स फॉर द फ्यूचर’च्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया फ्लिन एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. त्यांच्या मते, विविध उद्योग आणि व्यवसायांमध्ये अशी काही कौशल्ये आहेत, जी एआय कधीच बदलू शकत नाही. ही कौशल्ये पूर्णपणे मानवी आहेत. हे अगदी खरे आहे. आज आयटी सपोर्टसारख्या तांत्रिक कामांच्या जागा निघतात तेव्हा अनेक कंपन्या चांगल्या संवाद कौशल्याची मागणी करतात. येथे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अशी 5 कौशल्ये दिली आहेत, जी केवळ नोकरी मिळवण्यासाठीच नाही, तर करिअरच्या प्रगतीसाठीही आवश्यक आहेत. या क्षेत्रांमध्ये आजही माणूस एआयपेक्षा खूप पुढे आहे, असे तज्ज्ञ मानतात. पहिले कौशल्य म्हणजे सहानुभूती होय. परिचारिकेचा व्यवसाय याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. रुग्णालयांमध्ये कागदपत्रांचे काम करण्यासाठी एआय उपयुक्त ठरू शकतो. यामुळे परिचारिकांना रुग्णांची अधिक सहानुभूतीने सेवा करण्यासाठी वेळ मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला माझी पत्नी रुग्णालयात दाखल होती तेव्हा तिथल्या परिचारिका आमच्यासाठी वरदान ठरल्या. त्यांनी जे केले ते कोणताही रोबोट कधीच करू शकत नाही. त्यांनी दिलेला धीर म्हणजे मशीनने केलेली विचारपूस नव्हती, तर तो एक खराखुरा मानवी जिव्हाळा होता. त्या सेवेमध्ये संवाद, विज्ञान आणि रुग्णाच्या प्रकृतीची अचूक समज एकत्र गुंफलेली होती. परिचारिकेमध्ये रुग्णाच्या भावना समजून घेण्याचे आणि त्याच्याशी जोडले जाण्याचे मानवी गुण असतात. आजारातून लवकर बरे होण्यासाठी हीच काळजी सर्वात महत्त्वाची असते. दुसरे कौशल्य म्हणजे संबंध निर्माण करणे. अलीकडेच मी एका रिअल इस्टेट कार्यालयात गेलो होतो. तिथे ग्राहकांकडून पैसे गोळा करणारे कर्मचारी सर्वात जास्त तणावाखाली होते. परंतु, त्यांच्यातील काही जण आपले काम खूप चांगल्या प्रकारे करत होते. त्यांनी फाइल्स आणि डेटाबेस तयार करण्याचे काम एआयवर सोपवले होते. ते स्वतः मात्र ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक संबंध जोडण्यावर लक्ष केंद्रित करत होते. जेव्हा पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले तेव्हा हेच परस्पर कौशल्य कामाला आले. लोकांच्या अपेक्षा सांभाळणे, त्यांची नाराजी दूर करणे आणि नाते निर्माण करणे यासाठी माणसाचीच गरज असते. एआय असा विचार करू शकत नाही. तिसरे कौशल्य म्हणजे सखोल विचारक्षमता अर्थात क्रिटिकल थिंकिंग. एआय मॉडेल्स माहिती गोळा करून उत्तरे तयार करू शकतात, पण ते स्वतःच्या चुका शोधू शकत नाहीत. एआयने दिलेल्या उत्तराचा योग्य अर्थ लावण्यासाठी माणसाकडे समज, सखोल विचार करण्याची क्षमता आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एआय चॅटबॉट्समध्ये नेहमी युझर्सची मनधरणी करण्याची आणि त्यांच्या भावनांचे समर्थन करण्याची प्रवृत्ती असते. माणसाच्या तुलनेत ते युझरच्या कृतींचे 49% जास्त समर्थन करतात. नेमक्या याच ठिकाणी माणसाला थोडे थांबून गंभीरपणे विचार करावा लागतो. चौथे कौशल्य म्हणजे सद््सद्््विवेकबुद्धी होय. काय योग्य आणि काय अयोग्य यातील फरक ओळखणे किंवा अंतरात्म्याचा आवाज ऐकणे हे केवळ मानवी कौशल्य आहे. आपण आपल्या भावना आतून अनुभवतो हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत नैतिक ठरेल असे एआय मॉडेल तयार करणे अत्यंत कठीण आहे. पाचवे कौशल्य म्हणजे निर्णय घेणे. रणनीती तयार करताना किंवा ब्रँडची ओळख निर्माण करताना एआय अपयशी ठरतो. अस्पष्ट परिस्थितीमध्ये निर्णय घेणे आणि कल्पक कल्पना देणे एआयला सहज जमत नाही. माणूस आपल्या संपूर्ण ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या जोरावर निर्णय घेतो. याउलट एआय केवळ डेटाच्या आधारे निर्णय घेतो. ही पद्धत गुंतागुंतीच्या किंवा अस्पष्ट परिस्थितीत अजिबात काम करत नाही. फंडा असा की… आर्थिक बदल, तांत्रिक स्थित्यंतरे आणि बाजारातील चढ-उतार या काळात कोणतेही साधन किंवा तंत्रज्ञान वापरले जात असले तरी ‘ड्युरेबल स्किल्स’ म्हणजेच टिकाऊ कौशल्ये हीच अशी गोष्ट आहे, जी कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी खरोखर मूल्यवान बनवते.



Source link