Thursday, September 10, 2026
Homeफलटणएकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर                                                           साखरवाडी | प्रतिनिधी :  गुळुंचे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सोमेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हळहळला आहे. दि. ६ जून रोजी आयशर टेम्पो आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात मुरुम (ता. फलटण, जि. सातारा) येथील दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर गंभीर अवस्थेतील पवन बोडरे याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवार, दि. ९ जून रोजी रात्री सुमारे १.३० वाजता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
यापूर्वी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सेजल आणि अक्षरा बोडरे या दोन्ही बहिणींवर रविवारी मुरुम येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर पवनच्या निधनाची बातमी समोर येताच गावावर पुन्हा एकदा शोककळा पसरली.
पवन हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि सर्वांचा लाडका मुलगा म्हणून ओळखला जात होता. मात्र, नियतीच्या एका क्रूर घावाने तिन्ही भावंडांची स्वप्ने कायमची अधुरी राहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
एकाच कुटुंबातील तिन्ही सख्या भावंडांचा झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. :::

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments