
राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजली
मुंबई, दि. १० जून २०२६ : आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळीशी अखंड निष्ठा राखणारे समता सैनिक दलाचे मेजर जनरल तथा ज्येष्ठ कार्यकर्ते कालकथित बाबु विष्णू सावंत (गुरुजी) यांना भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आद. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी त्यांच्या गोवंडी येथील लुंबिनीबाग निवासस्थानी जाऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
कालकथित बाबु विष्णू सावंत यांचे रविवार, दि. ७ जून रोजी निधन झाले. त्यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर हे लखनौ येथे पूर्वनियोजित धम्म व सामाजिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, देशभरातील व्यस्त दौरे आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या चळवळीतील या निष्ठावंत सैनिकाला आदरांजली वाहण्याचे कर्तव्य विसरले नाही. लखनौहून परतल्यानंतर दि. ९ जून रोजी पहाटे ३ वाजता मुंबईत दाखल झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही विश्रांती न घेता दिवसभर न्यायालयीन कामकाज पूर्ण केले आणि दुसऱ्याच दिवशी स्वर्गीय सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहिले.
यावेळी त्यांनी कालकथित बाबु विष्णू सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून आर्थिक मदतही केली. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असूनही त्यांनी कोणताही मोठेपणा किंवा पदाचा आविर्भाव न बाळगता एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला. झोपडपट्टीतील अरुंद गल्लीपर्यंत पोहोचून त्यांनी दिलेला हा आपुलकीचा स्पर्श उपस्थितांच्या मनाला भावून गेला.
कालकथित बाबु विष्णू सावंत यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ आणि आंबेडकर परिवाराची निस्वार्थ सेवा केली. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करताना डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही केवळ एका कार्यकर्त्याला वाहिलेली आदरांजली नसून चळवळीतील प्रत्येक निष्ठावंत सैनिकाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.
डॉ. भीमराव आंबेडकर हे नेहमीच धम्म चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आले आहेत. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता, विश्वास आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अनेकांनी नमूद केले.
कालकथित बाबु विष्णू सावंत यांना वाहिलेली ही आदरांजली म्हणजे निष्ठा, समर्पण आणि चळवळीप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला.









