
प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त
फलटण :चव्हाणवाडी (प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी चे मुख्याध्यापक आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी आपल्या सेवेला साश्रूनयनांनी विराम देत सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विठ्ठल निकाळजे सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, नेतृत्वगुण, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि शाळाविकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या. अनेकांनी निकाळजे सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद केले. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून ही उत्कृष्ट पद्धतीने शाळेचे व्यवस्थापन सांभाळले.
सेवानिवृत्तीप्रसंगी बोलताना विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, पण जिद्द कधी हरली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा, हा विचार मनात ठेवून मी सदैव कार्यरत राहिलो. ज्या-ज्या शाळांमध्ये काम केले, त्या प्रत्येक ठिकाणी रयत सेवक म्हणून प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. आज अनेक विद्यार्थी विविध चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, याचा मला अभिमान वाटतो.”
ते पुढे म्हणाले, “सर्वप्रथम मी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व या कामांमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य इथल्या गोरगरिबाच्या, बहुजन समाजाच्या, मुलांच्यासाठी खर्ची घातलं त्या रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या विचार व कार्याला वंदन करतो.
श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे मला खऱ्या अर्थाने चांगले काम उभे करता आले. यासाठी माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे, स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि पालकांचे अमूल्य सहकार्य लाभले. कमिन्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून शाळेचे वॉल कंपाऊंड, संगणक कक्ष, रंगरंगोटी, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बोरवेल, प्रशस्त सुलभ शौचालय युनिट, इंटरऍक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड यांसारखी अनेक विकासकामे करता आली. या सर्व कार्यात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय दत्तात्रय (तात्या) चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.”
शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत, “सेवानिवृत्तीनंतरही जिथे माझी गरज भासेल, तिथे मदतीसाठी मी सदैव उपलब्ध असेन. माझे सहकारी शिक्षक, ग्रामस्थ, स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीने विठ्ठल निकाळजे सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या बीबीएम फॅमिली अर्थात भारतीय बौद्ध महासभा परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही निकाळजे सर यांना पुष्पगुच्छ अर्पण करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली. सेवानिवृत्ती हा सेवाकाळाचा शेवट नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.
कार्यक्रमास श्री दत्तात्रेय (तात्या) बाबुराव चव्हाण (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), श्री प्रशांत शिंदे (उपसरपंच, ग्रामपंचायत चव्हाणवाडी), श्री गोरख शिंदे (ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते), सौ. सुप्रियाताई अहिरेकर (स्कूल कमिटी सदस्य, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल), श्री चंद्रकांत भोईटे (उपशिक्षक, आदर्श विद्यालय शिरवळ), सौ. लता भोईटे (ग्रंथपाल, आदर्श विद्यालय शिरवळ), श्री ज्ञानेश्वर वाघ (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), मुख्याध्यापक श्री विठ्ठल निकाळजे सर, नूतन प्रभारी मुख्याध्यापक श्री.राजेंद्र राजपुरे, श्री जितेंद्र चव्हाण (फौजी), श्री सचिन अहिरेकर (उद्योजक), श्री किशोर शिंदे, श्री सोमीनाथ घोरपडे (जन संपर्क अधिकारी व समन्वयक,प्रगत शिक्षण संस्था, फलटण), श्री बाबासाहेब जगताप (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), श्री.रामचंद्र मोरे (सुहाना मसाला डिस्ट्रीब्युटर, सातारा जिल्हा), श्री आनंद जगताप (उद्योजक, फलटण), श्री विजय निकाळजे, श्री अजय निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.









