फलटण : श्रीराम कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, ‘जवाहर’ करार रद्द करण्यावरून जोरदार खडाजंगी

0
19
फलटण : श्रीराम कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, ‘जवाहर’ करार रद्द करण्यावरून जोरदार खडाजंगी

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ‘जवाहर’ बरोबर असलेला करार रद्द करून नवीन करार ‘श्री दत्त इंडिया’ बरोबर करण्याचा ठराव सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयावरून सभागृहात वातावरण चांगलेच तापले होते.

सभेत विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण तसेच चेअरमन बाळासाहेब शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिला असून शेतकरी समाधानी असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात आला. “संजीवराजे यांच्या नेतृत्वावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे,” अशी भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली.
दुसरीकडे विरोधी गटाचे नेते तथा फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम, शिवरूपराजे खर्डेकर-भोसले तसेच शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांनी सत्ताधारी गटावर विविध प्रश्न उपस्थित केले. ‘जवाहर’ करार रद्द करण्यामागील कारणे, नवीन कराराच्या अटी, आर्थिक व्यवहार आणि निर्णय प्रक्रियेबाबत त्यांनी आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेरीस ‘श्री दत्त इंडिया’ बरोबरच्या नवीन कराराचा ठराव मंजूर करण्यात आला. या सभेमुळे श्रीराम कारखान्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे.