Monday, August 17, 2026
Homeफलटणविकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या हद्दीतील शंकर मार्केट आणि ब्राह्मण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पिण्याच्या पाईपलाईन कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोणतीही पूर्वसूचना, योग्य नियोजन किंवा पर्यायी व्यवस्था न करता सुरू करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे.
नागरिकांनी सांगितले की, रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आल्याने अनेक वाहनधारकांची वाहने अडकून पडली आहेत. परिसरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली असून नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तीव्र उकाड्यात त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच शंकर मार्केट व ब्राह्मण गल्ली परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ४ आणि ८ मध्ये दोन्ही बाजूंनी खड्डे खोदण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित लोकप्रतिनिधींनी कामाच्या ठिकाणी उशिरा भेट दिल्याचा आरोप करत, नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात ते अपयशी ठरल्याची टीकाही करण्यात आली.
“विकासकामे करताना सर्व नागरिकांचा विचार होणे आवश्यक आहे. विकास हा राजकारणमुक्त आणि सर्वसमावेशक असावा. एक-दोन घरांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसर वेठीस धरणे हा विकासाचा योग्य दृष्टिकोन असू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
ब्राह्मण गल्लीमध्ये राजकारण आणू नये, अशी मागणी करत नागरिकांनी चांगल्या कामांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र नागरिकांना त्रास देणाऱ्या कामांविरोधात कायम भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, संबंधित लोकप्रतिनिधींनी एका सजग नागरिकाला “विघ्नसंतोषी” संबोधल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे नेमके कोण आहेत, हे आता जनतेला चांगलेच समजले आहे,” असा पलटवार नागरिकांनी केला.
या प्रकरणावरून नागरिक, ठेकेदार तसेच आजी-माजी नगरसेवक यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी तसेच अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments