Thursday, August 20, 2026
Homeसाताराफलटण पंचायत समितीत २० लाखांचा घोटाळा; कनिष्ठ लिपिकाने पगार वाढवून केला अपहार

फलटण पंचायत समितीत २० लाखांचा घोटाळा; कनिष्ठ लिपिकाने पगार वाढवून केला अपहार

फलटण :- फलटण पंचायत समितीतील एका कनिष्ठ लिपिकाने आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल २० लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्याची बदली पाटण येथे झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याने ऑनलाइन पोर्टलमध्ये फेरफार करून स्वतःच्या पगारात वाढ दाखवली आणि सन २०२३ ते २०२५ या कालावधीत हळूहळू ही रक्कम काढून घेतली. या प्रकारामुळे पंचायत समितीच्या कारभारातील मोठ्या त्रुटी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती समोर येताच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, फलटण पंचायत समितीत गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असून, याच काळात अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. “कुंपणच शेत खात आहे” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात केवळ एकाच कर्मचाऱ्याचा सहभाग आहे की आणखी कुणी अधिकारी किंवा कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत, याचा तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात संपूर्ण आर्थिक लेखापरीक्षण करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोमले यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, वरिष्ठ स्तरावरूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांच्या समितीद्वारे चौकशी नेमावी, अशी मागणी होत आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल तपास करून या घोटाळ्यामागील संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशीही मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments