
फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील नरसोबानगर परिसरात घडलेली एक सकारात्मक आणि प्रेरणादायी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीतही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शन या घटनेतून घडले आहे.
नरसोबानगर येथील जीवनज्योत हॉस्पिटल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकास्तरीय नेते नंदकुमार मोरे आणि त्यांचे सहकारी विशाल भागवत यांना एक बेवारस बॅग आढळली. कोणाची तरी महत्त्वाची वस्तू हरवली असावी, या भावनेतून त्यांनी बॅगेची पाहणी केली असता, त्यामध्ये असलेल्या माहितीवरून ती बॅग मालोजीनगर (कोळकी) येथील रहिवासी सौ. संजना चैतन्य रायकर यांची असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर नंदकुमार मोरे यांनी तत्काळ भाजपचे युवा नेते संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत संजय देशमुख यांनीही त्वरीत सौ. रायकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची हरवलेली बॅग सुरक्षित असल्याची माहिती दिली.
काही वेळातच सौ. संजना रायकर यांना त्यांची बॅग सन्मानपूर्वक आणि पूर्णतः सुरक्षितपणे परत करण्यात आली. आपली हरवलेली बॅग जशीच्या तशी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी नंदकुमार मोरे, विशाल भागवत, संजय देशमुख यांच्यासह रोहित मुळीक, डेव्हिड वाकोडे, गणेश, प्रतीक मोरे आणि यश राठोड आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एका सामान्य नागरिकाच्या मदतीसाठी एकत्र येत दाखवलेला समन्वय आणि प्रामाणिकपणा समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.








