फलटणमध्ये व्यापाऱ्यांना धमकावण्याची घटना; मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना शिवीगाळ, आरोपींवर कारवाईची मागणी

0
9
फलटणमध्ये व्यापाऱ्यांना धमकावण्याची घटना; मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना शिवीगाळ, आरोपींवर कारवाईची मागणी

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाडस वाढत असल्याची चिंताजनक घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली. आंबेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गावरील ‘हिंदुस्तान हार्डवेअर’ समोर भररस्त्यात झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या पटेल बंधू आणि त्यांच्या कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दोन इसम भरधाव वेगाने वाहन चालवत असताना ‘कट’ मारण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत परिवर्तित झाला. दुकानासमोरच गोंधळ सुरू असल्याने व्यवसायावर परिणाम होत होता.
मानवतेच्या भावनेतून ‘हिंदुस्तान हार्डवेअर’चे मालक पटेल बंधू यांनी संबंधित तरुणांना “दुकानाबाहेर भांडण करू नका” अशी विनंती करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विनंतीचा राग मनात धरून संबंधित तरुणांनी पटेल बंधूंवर धाव घेत त्यांना खालच्या दर्जाची शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, दुकानातील कामगारांनाही जातीवाचक शब्दांनी अपमानित करत धमकावल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दोन दिवसांपूर्वीच शंकर मार्केट परिसरात ‘गाडी हळू चालवा’ असे सांगितल्याच्या कारणावरून कोयते काढण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा भरवस्तीत व्यापाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रकार समोर आल्याने व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
“मध्यस्थी करणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः कामगारांना जातीवरून हिणवण्याचा प्रकार गंभीर असून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांची गर्दी
घटनेनंतर फलटणमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येत शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी तसेच व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत तर व्यापारी संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
फलटण शहरात वाढत्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाची मागणी आहे.