
Benefits Of Walking 20 Minuts Daily: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचे परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर, मानसिक आरोग्यावरही होत असतात. कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच काही कामे अशी असतात, ज्यामध्ये सलग 8 ते 9 तास एकठिकाणी बसून काम करावे लागते. शरीराची फारशी हालचाल होत नाही. याशिवाय खाण्याच्या वेळा पाळता येत नाहीत, जंक फूडचे सेवन वाढते. लठ्ठपणा वाढतो, व्यायाम करण्यासही वेळ मिळत नाही. कामाच्या ठिकाणी वाढता ताण, रोजचा धकाधकीचा लोकल प्रवास यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. सतत थकवा जाणवतो. मुख्य म्हणजे रोज तेच काम, तोच प्रवास यामुळे जीवनातील आनंद हरवून गेला आहे असे वाटते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, रोज फक्त 20 मिनिटे चालणे या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो.
अनेक जणांना कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील दररोज फक्त 20 मिनिटे चालणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे फक्त आरोग्यदायी फायदेच नाही तर, रोज एक नवीन ऊर्जाही मिळेल. तुम्ही तुमच्या रोजच्या कंटाळवाण्या दिवसाचे रूपांतर एका ऊर्जात्मक आणि आनंददायी दिवसात करू शकता.
दररोज 20 मिनिटे चालल्याने काय फायदे मिळतात?
1. मानसिक आरोग्य सुधारते
चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन (Endirphins) हे ‘फील-गुड’ हार्मोनची निर्मिती होते. यामुळे तणाव कमी होतो, चांगली झोप मिळते, स्मरणशक्तीही सुधारते आणि आनंददायी वाटते.
2. हृदयाचे आरोग्य
शरीराची हालचाल न झाल्यास रक्ताभिसरण संस्था मंदावते. शरीरात योग्यप्रकारे रक्तप्रवाह होत नाही. रोज फक्त 20 मिनिटे चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होते, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे सुमारे 30 टक्क्यांपर्यंत हृदयाचा धोका कमी होतो.
3. पचन सुधारते आणि वजन नियंत्रित राहते
जरी कमी व्यायाम करत असला किंवा व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तरी, दरोरज 20 मिनिटे चालल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. तसेच जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
4. स्नायू आणि हाडे मजबूत होतात
चालल्यामुळे पायांचे स्नायू आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात. तसेच हाडांची घनता वाढते. ज्यामुळे भविष्यात सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
5. शारीरिक ऊर्जा वाढते
चालल्यामळे शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो. यामुळे दिवसभर येणारा थकवा नाहीसा होतो. दिवसभरात अधिक ऊर्जा जाणवते.







