डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मसंकल्पाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर – चंद्रकांत मोहिते

0
26
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मसंकल्पाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर – चंद्रकांत मोहिते

साहस Times (फलटण) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्मदीक्षेच्या माध्यमातून “भारत बुद्धमय करण्याचा” जो महान संकल्प केला, तो त्यांच्या पश्चात अखंडपणे पुढे नेण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू फुले आंबेडकर सभागृह, कोळकी येथे आयोजित अभिवादन सभेत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव आयु बाबासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान बजरंग गायकवाड, ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, धम्म उपासक विजय निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शनात आयु. चंद्रकांत मोहिते म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांनी कधीही वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरफायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर उद्योग, व्यवसाय उभे केले आणि नंतर संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला व धम्मकार्याला अर्पण केले. ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’च्या माध्यमातून बाबासाहेबांचे ग्रंथ, नियतकालिके व विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

चैत्यभूमी, कफ परेड येथील बाबासाहेबांचा पुतळा, चवदार तळे क्रांतीस्थळ यांसारख्या स्मारकांच्या उभारणीत भैय्यासाहेबांचा निर्णायक सहभाग होता. “मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही” या ठाम भूमिकेमुळेच चैत्यभूमीचा भव्य आकार साकार झाला. जनतेच्या सहभागातून स्मारक उभारणीसाठी त्यांनी मुंबईभर जनजागृती केली, हे इतिहासात अजरामर आहे.

१९६६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘भीम-ज्योत’ महू ते मुंबई असा प्रेरणादायी प्रवास काढून धम्मदानाच्या माध्यमातून चैत्यभूमी स्मारक उभारणीला चालना देण्यात आली. तसेच १९६८ साली मुंबई येथे झालेल्या भव्य धम्मपरिषदेत बौद्ध संस्कार आचारसंहिता स्वीकारली गेली आणि “बौद्ध जीवन संस्कार पाठ” हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले.

भैय्यासाहेब आंबेडकरांनी “भारत बौद्धमय करीन” हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी बाळगून धम्मदीक्षा, परिषद, मेळावे, विहार उद्घाटने यांद्वारे धम्मप्रसाराला अखंड गती दिली. स्वतः श्रामणेर दीक्षा घेऊन “महापंडित काश्यप” हे दीक्षानाम धारण करत त्यांनी आपल्या आचरणातूनही धम्माचा आदर्श समाजासमोर ठेवला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचार व कार्याला विनम्र नमन करत उपस्थितांनी “जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय”च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून टाकले.