फलटणमध्ये भाडेवाढीचा वाद पेटला! दोन दिवस गाळे बंद; शहर बंदची चेतावणी

0
16
फलटणमध्ये भाडेवाढीचा वाद पेटला! दोन दिवस गाळे बंद; शहर बंदची चेतावणी

फलटण प्रतिनिधी :- फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे भाडेवाढीविरोधात सुरू असलेले साखळी उपोषण आज १९ व्या दिवशी पोहोचले असून, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने गाळाधारकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील दोन दिवस सर्व गाळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तरीही न्याय मिळाला नाही तर संपूर्ण फलटण शहर बंद करण्याचा इशारा फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

अधिकारी गृहासमोर गेल्या १९ दिवसांपासून गाळाधारक संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत आंदोलन सुरू ठेवणाऱ्या गाळाधारकांच्या मागण्यांकडे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि बाजार समिती प्रशासन यांनी अद्याप दुर्लक्ष केल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.

निकम म्हणाले, “भाडेवाढ योग्य असल्याचे सांगणारे अधिकारी बायलॉज दाखवू शकत नाहीत. जीएसटी लागू नसतानाही तो आकारला जात आहे. इतर ठिकाणी बाजार समिती भुईभाडे भरते, मात्र फलटणमध्ये हे ओझे गाळाधारकांवर टाकले आहे.”

याचबरोबर त्यांनी बाजार समितीवर गंभीर आरोप करत सांगितले की, “गाळाधारकांची चर्चा घेऊन सह्या घेतल्या आणि त्या सह्यांचा आधार घेत भाडेवाढीचे प्रोसेसिंग केले. म्हणजेच सह्या फसवून घेतल्या गेल्या आहेत.” याबाबत संबंधित तक्रारी प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले..