
फलटण प्रतिनिधी — उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी आज संपल्याने, दोघांना फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील अॅड. क्षमा बांदल यांनी न्यायालयात मांडणी करताना सांगितले की, आरोपींकडील मोबाईल, पेनड्राइव्ह व लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. तसेच आरोपींकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळू शकते, म्हणूनच पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गोपाळ बदने यांचे वकील अॅड. धायगुडे यांनी बचाव करताना सांगितले की, बदने स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते. तसेच पीडितेच्या बहिणीने हस्तलिखित नोटवरील अक्षर तिचे नसल्याचे स्पष्ट केले असल्याने तो पुरावा ग्राह्य धरू नये. आरोपीचा मोबाईल व तीन पेनड्राइव्ह आधीच पोलिसांकडे असल्याने पुढील चौकशीची गरज नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता.
प्रशांत बनकर यांचे वकील अॅड. सुनील भोंगळे यांनी देखील समान मांडणी करताना सांगितले की, २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या कोठडीत पोलिसांनी बनकर यांचा लॅपटॉप व मोबाईल आधीच ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता आरोपीची कोठडी वाढवण्याचे कारण नाही.
यावर प्रतिवाद करताना सरकारी वकील बांदल यांनी सांगितले की, पीडितेच्या हातावरील हस्ताक्षर तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवले जाईल आणि त्यांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय होऊ शकतो. याशिवाय दोन्ही आरोपींकडून अजून काही माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे. एस. खेडकर गोयल यांनी दोन्ही आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.







