
फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाळ बदने अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र २५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात त्याने शरणागती पत्करली आहे.
या प्रकरणात महिला डॉक्टरला त्रास दिल्याप्रकरणी घरमालक प्रशांत बनकर याला सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करत सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत बदने याला निलंबित केले होते.
आत्महत्येनंतर दोघेही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी बदनेचा शोध सुरू ठेवला असताना त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले होते. अखेर तो रात्री उशिरा पोलीस ठाण्यात शरण आला.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.







