रामराजेंचा कार्यकर्त्यांना जागे करण्याचा निर्धार: ‘सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी जिंकणार?’”

0
27
रामराजेंचा कार्यकर्त्यांना जागे करण्याचा निर्धार: ‘सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी जिंकणार?’”

कोळकी (ता. फलटण) :   आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकून, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा निर्धार करत, विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे आयोजित मेळाव्यात जोरदार भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित झालेला हा मेळावा, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या पाठीमागील अनंत मंगल कार्यालयात पार पडला. बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर झालेल्या या मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती.

पराभवाचं आत्मपरीक्षण आणि तीव्र कानपिचक्या

रामराजेंनी सुरुवातीलाच मागील निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करत थेट कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.
एवढी लोकं जमवता मग सीट का पडते? कार्यकर्ते आहेत, जनतेत राग नाही, मग पराभव का?” असा थेट सवाल करत त्यांनी निवडणुकीआधी विरोधकांकडून पैसे वाटले जात असताना कार्यकर्ते गप्प का राहिले, यावर ताशेरे ओढले.

तुमच्या गावात रात्रीच्या पैशाच्या गाड्या फिरत होत्या, तेव्हा तुम्ही बायकांबरोबर टीव्ही बघत होता का? पाय रोवून जर तुम्ही बाहेर पडलात असता, तर पैसे वाटप थांबलं असतं,” अशा रोखठोक शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना झापले.

“सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी?”

रामराजेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लढाई करायची आहे, पण सैन्यच जर पळपुटं निघालं, तर आमचं काही खरं नाही.” ही लढाई केवळ राजकीय नसून, कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची आणि सामान्य जनतेच्या शांततेने जगण्याच्या हक्काची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बदललेल्या राजकारणावर सडकून टीका

तालुक्यातील सध्याच्या राजकारणातील बदलांवर सडकून टीका करत रामराजेंनी २०१९ नंतरचा काळ आठवला.
कॉन्ट्रॅक्टर असाल तर बिलं अडवतो, अवैध वाळूवाल्यांवर दंड, पोलिसांमार्फत दमदाटी, खोट्या केसेस – हे सगळं सुरू आहे, पण आम्ही कधीच सत्ता वापरून त्रास दिला नाही, ते आमच्यातले संस्कार नव्हते,” असे ते म्हणाले.

पक्ष नव्हे, गट महत्त्वाचा – भविष्यातील दिशेवर संकेत

आपला मूळ पक्ष अपक्ष आहे, पक्ष गौण, गट महत्त्वाचा.” असे सांगत रामराजेंनी भविष्यात कोणत्या पक्षात जाणार यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सूचित केले.
कोणत्या पक्षात जायचं, ते मी ठरवीन. मी ३० वर्षे मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत नव्हतो,” असा टोला त्यांनी दिला.

‘गेले ते मेले’ – सोडून गेलेल्यांवर उपहास

सोडून गेलेल्यांबद्दल बोलताना, “गेले ते मेले” म्हणत त्यांनी विषयावर अधिक बोलणे टाळले. “संध्याकाळी यादी काढा, एक सणसणीत अंघोळ करा आणि ‘ओम शांती’ म्हणा,” असे सांगत त्यांनी या विषयावर फुलस्टॉप टाकला.

        विकास कामांचे श्रेय आणि तरुण पिढीवर भाष्य

निरा देवघर धरण आणि श्रीराम कारखाना यासारख्या विकास प्रकल्पांबद्दल भाष्य करत त्यांनी श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.
धरणच झालं नसतं, तर पाईपलाईन कुठून टाकली असती? दुष्काळ पाहिलेला नाही, म्हणून तरुण कालव्यात बुड्या मारतायत,” अशी टीका करत त्यांनी तरुणांना इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.

       कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

शेवटी, पाय रोवून गावात उभे राहण्याचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतला. मोठ्या संख्येने हात वर करून कार्यकर्त्यांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
“आपण सर्वांनी एकत्र आलो, पुन्हा मैदानात उतरणार आहोत, आणि यावेळी इतिहास घडवणार,” असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

     विशेष वैशिष्ट्ये:

  • भाषणाचा ठाम, प्रखर आणि स्फूर्तिदायक सूर
  • विरोधकांवर मुद्देसूद टीका
  • कार्यकर्त्यांना सरळपणे जबाबदारीची जाणीव
  • राजकीय दिशा अद्याप ठरवलेली नाही
  • कोळकी परिसरातील राजकीय हालचालींना गती