फलटण : ‘भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पुर्ण करावयाची जबाबदारी आपल्यावर असून प्रत्येक बौध्द उपासक व उपासिका यांनी धम्माचे काटेकोर पालन करावे.आपले आचार विचारांचे पालन करावे असे आव्हान भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेतील मौजे विंचूर्णी येथे दहावे पुष्प गुंफताना केले.
यावेळी बोलताना प्रवचनकार आयु.चंद्रकांत मोहिते यांनी बौद्ध धम्मच्या आचरणाचे नियम व श्रावण पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. त्यांनी उपासक-उपासिका यांनी पंचशीलेचे पालन करुन नीतिमान जीवन जगण्याचा संदेश दिला. धम्म हा निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड सोडून देऊन धम्माचे आचरण केल्याने आपण आपला विकास करू शकता अन्यथा विनाश अटळ असल्याचे चंद्रकांत मोहिते म्हणाले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु.बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्त्व समजून सांगितले. वर्षावासाचा कालखंड हा उपासक उपासिकासाठी किती महत्वाचा आहे हे ही त्यांनी समजावून सांगितले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, तसेच संघटक आयु. विजयकुमार जगताप हे उपस्थित होते. या वेळी विंचूर्णी गावचे श्रद्धावान, शीलवान, गुणवान धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने हजर होते.
फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक विंचुर्णीतील बौद्ध उपासक व उपासिकांना देण्यात आले.याच दरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या फलटण शाखेकडून संविधान उद्देशिका आणि वंदना सूत्रपठन पुस्तिका लहान मुलांना देण्यात आली.