फलटण, 31 जुलै 2025 –राजकारणात सध्या अनेक समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही काळ अलिप्त झाल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नुकतेच फलटण तालुक्यातील कोळकी येथे कार्यकर्त्यांच्या समोर दिलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. “माझे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका,” असे सांगत रामराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि रामराजेंमध्ये पडद्याआड खलबते झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी, श्रीमंतांची पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात दमदार पुनरागमन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत ‘राजेगट’ हा बॅड बुकमध्ये असल्याची कुजबुज होती, पण आता तो गुड बुकमध्ये येतोय, अशी चर्चा रंगली आहे.
तीन दशकांची शाश्वत कामगिरी
गेल्या ३० वर्षांत रामराजेंनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात जलसिंचनाच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल ८१ टीएमसी पाणी अडवले गेले असून, ५५ तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे ते अजित पवार यांच्यासाठी आजही एक विश्वासू आणि अनुभवी चेहरा ठरू शकतात.
राजकीय समीकरणे बदलणार?
महाविकास आघाडीने लोकसभेत ३० खासदार निवडून आणल्यावर विधानसभेतही तेच चित्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक अंतर्गत घटकांमुळे महायुतीने विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे संजीवराजेंकडे दिली होती, त्याच वेळी रामराजे निंबाळकरही प्रमुख भूमिकेत होते. आता पुन्हा हेच चित्र उभे राहण्याची शक्यता आहे.
अनिकेतराजेंचा सुसंवाद
अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामराजेंचे सुपुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांनी अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे रामराजे कुटुंबीय पुन्हा एकदा अजितदादांच्या जवळ जात असल्याची स्पष्ट चिन्हे राजकीय वर्तुळात उमटली आहेत.
रामराजेंच्या वयाकडे पाहून नाही, कर्तृत्वाकडे पाहा
राजकारणात वयाच्या आधारावर अनेक वेळा टीका होते. पण रामराजेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अनुभव आणि प्रशासनातील दांडगा प्रभाव आजही त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा महत्त्वाच्या निवडणुकांत अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या खांद्यावरच आपली धुरा सोपवणार, असे संकेत मिळत आहेत.