सातारा | साहस Times प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्याचा शासनाचा कटाक्ष राहणार आहे, अशी ठाम ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी दिली आहे.
खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा शिरसवडी (७ वर्ग) व पळशी (९ वर्ग) येथील नवीन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मा. आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, युवानेते अंकुश गोरे, प्रा. बंडा गोडसे, अनिल माळी, धनंजय चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, सोमनाथ भोसले, विशाल बागल, डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक बनवण्याचा निर्धार
मंत्री गोरे म्हणाले, “जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन सर्व सुविधा देणार आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. खाजगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळाही आदर्श बनल्या पाहिजेत. यासाठी सेमी इंग्लिश शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे.”
गावकऱ्यांचे सहकार्य शाळांच्या यशाचे गमक
“ज्या शाळांमध्ये गावकऱ्यांनी सहकार्य केले, त्या शाळा आदर्श शाळा बनल्या. शिरसवडी व पळशी हे त्याचे उदाहरण आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्थानिकांनी शाळांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ द्यावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकासकामांना निधीचा अडथळा नाही
रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण यावर शासनाचा प्राधान्यक्रम असून माण-खटावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ZP शाळांच्या विद्यार्थ्यांनी साधले उच्चपदस्थ यश
“आज जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले विद्यार्थी विविध संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करावे,” असे आवाहनही मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना केले.