बारामतीकरांसाठी ‘हॅपी स्ट्रीटस’चा पर्वणीसारखा आनंद!

0
4
बारामतीकरांसाठी ‘हॅपी स्ट्रीटस’चा पर्वणीसारखा आनंद!

बारामती ( साहस Times ) :- बारामतीकर नागरिकांनी मोबाईलपासून दूर राहत, मोकळ्या हवेत, खेळ, संगीत, कला आणि पर्यावरणाच्या सहवासात आनंद अनुभवावा, या उद्देशाने ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ या दोन दिवसीय अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार २६ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते रात्री १० आणि रविवार २७ जुलै रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत विद्या कॉर्नरजवळील जळोची कॉर्नर ते गदिमा पर्यंतच्या रस्त्यावर विविध झोनमध्ये हे उपक्रम पार पडणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.

या उपक्रमात आर्ट, म्युझिक, नेचर अँड सफारी, गेम्स, हेल्थ अँड फिटनेस, पर्यावरण असे विविध झोन तयार करण्यात आले असून नागरिकांना हे सर्व विनामूल्य अनुभवता येणार आहे.

  • आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटिंग, पोर्ट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग यांचा समावेश आहे.
  • सफारी झोनमध्ये नक्षत्र उद्यान परिसरात घोडेस्वारी, उंट सफारी, बैलगाडीतून फेरफटका घेता येणार आहे.
  • हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये योगा, मल्लखांब, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर होतील.
  • गेम झोनमध्ये सापशिडी, लगोरी, लुडो, गोट्या, कॅरम, बुध्दीबळ, बलून शूट, बास्केटबॉल, आर्चरी यांसारखे पारंपरिक व आधुनिक खेळ खेळता येणार आहेत.
  • पर्यावरण झोनमध्ये बारामती नगरपरिषदेच्या सहकार्याने स्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, ई-कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंगबाबत माहिती दिली जाईल.
  • म्युझिक झोनमध्ये गिटार, माउथ ऑर्गन, अँकार्डियनसारख्या वाद्यांवर सादरीकरण होईल.

याशिवाय खवैय्यांसाठी महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मुलांसाठी कार्टून पात्रे, जादूगार व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

खाद्यपदार्थ वगळता इतर सर्व उपक्रम मोफत असून, बारामतीकरांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.