Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत अतिक्रमणाच्या वादातून वकिलाचा थेट कात्रीहल्ला; गुन्हा दाखल

बारामतीत अतिक्रमणाच्या वादातून वकिलाचा थेट कात्रीहल्ला; गुन्हा दाखल

बारामती | दुकानासमोर ठेवलेल्या साहित्यामुळे ये-जा करणाऱ्यांना होणाऱ्या अडथळ्याबाबत विचारणा करणे एका व्यावसायिकाच्या चांगलेच महागात पडले. मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्स येथे ही धक्कादायक घटना घडली असून, अडथळ्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या मोहन बोराटे या व्यावसायिकाला मनोहर डेंगळे नावाच्या वकिलाने थेट कात्रीने छातीवर वार करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डेंगळे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन भगवान बोराटे (रा. कसबा, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वकील मनोहर निवृत्ती डेंगळे (रा. गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बोराटे यांचा मुलगा प्रतीक आणि त्याचा मित्र श्रेयस ढवळे या दोघांचे मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्समध्ये आर्किटेक्चरल ऑफिस आहे. शेजारीच मनोहर डेंगळे यांचे दोन गाळे असून, त्या समोरून जाणारा पॅसेज हा लोकांच्या ये-जा करण्यासाठी वापरला जातो. मात्र, या पॅसेजमध्ये डेंगळे यांनी बंद पडलेली झेरॉक्स मशीन, बाकडे, खुर्च्या ठेवून रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. याबाबत अनेकदा विनंती करूनही डेंगळे यांनी साहित्य न हलवता, उलट दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दि. ३० जून रोजी मोहन बोराटे यांनी याविषयी थेट डेंगळे यांच्याशी चर्चा करताना वाद झाला. ‘मुलांवर हात का उचलला’ असा जाब विचारताच, रागाच्या भरात डेंगळे यांनी हातातील कात्रीने बोराटे यांच्या छातीवर वार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, कायद्याची जाण असलेल्या व्यक्तीकडून असा हिंसक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments