Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रमाळेगाव साखर कारखाना निवडणूक विजय : अजित पवारांचा आभार मेळाव्यात फटकेबाज अंदाज

माळेगाव साखर कारखाना निवडणूक विजय : अजित पवारांचा आभार मेळाव्यात फटकेबाज अंदाज

बारामती |राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत शनिवारी झालेल्या आभार मेळाव्यात अजित पवारांनी भावनिक आठवणी, राजकीय किस्से आणि परखड फटकेबाजी करत विरोधकांना जोरदार सुनावलं.

“मी कुणाचा दुश्मन नाही, पण काहींना स्वतःची हवा वाटत होती, म्हणूनच हा खेळ फिस्कटला,” असं सांगत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांच्यावर नाव न घेता घणाघात केला.

अजित पवारांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी सुरू होती, निवडणूक नको होती, वाटाघाटींचा पर्याय शोधत होतो. पण, विरोधकांनी मुद्दाम वादंग उभं केल्याने आपल्याला मैदानात उतरावं लागलं. “मी सांगेल त्याच्या घरी गेलो, मला गरज होती म्हणून नम्रपणे विनंती केली,” असेही त्यांनी सांगितले.

“चुकीचं काही मी खपवून घेणार नाही. आता मी चेअरमन होणार आहे, पारदर्शक कारभार केला जाईल,” असा ठणाणा अजित पवारांनी यावेळी केला.

त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ताकीद दिली की, निवडणुकीत क्रॉस वोटिंग कुठे-कुठे झालं याचे आकडे आपल्या कडे आहेत. यापुढे कोणताही गोंधळ खपवून घेतला जाणार नाही. “मी सांगेन तेच काम करायचं, नाहीतर राजीनामा द्या, गोंधळ नको,” असा दम त्यांनी निवडून आलेल्या संचालकांना भरला.

“पाच वर्षे मीच चेअरमन राहणार आहे. कुणाच्या डोक्यात वेगळं काही असेल, तर ते आधीच काढून टाका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

अजित पवारांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर दिला जाईल, आणि माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती कारखान्यांत तोडणी व वाहतूक नीट केली जाईल. कामगारांनी कामात गडबड केली तर कारवाई होणारच. व्यापाऱ्यांनी संचालकांच्या घरी न जाता सभेत तक्रार मांडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

राजकीय पातळीवर केलेल्या कटु अनुभवांची आठवण करत, अजित पवारांनी सांगितले की, “1991 पासून मी कारखान्याच्या मतमोजणीत सहभागी होतो. पण यावेळी उमेदवार कुठे होते? असं कसं चालेल?” असा सवालही त्यांनी केला.

ही सभा केवळ एक आभार मेळावा नव्हती, तर पुढील पाच वर्षांच्या कारभाराचे स्पष्ट संकेत देणारी आणि विरोधकांना ठणकावून सांगणारी होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments