Sunday, August 30, 2026
Homeसातारासंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चांदोबाच्या लिंबावर उभ्या रिंगणाने भक्तिमय स्वागत

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चांदोबाच्या लिंबावर उभ्या रिंगणाने भक्तिमय स्वागत

फलटण : टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘माऊली… माऊली’ च्या गजरात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे पारंपरिक भक्तिभावाने पार पडले. अश्व रिंगणाच्या या देखाव्याने हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.

दुपारी सव्वा चार वाजता राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वांचे रिंगण सुरू झाले. स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व रथाच्या दिशेने एकामागून एक धावत गेले. टाळ, मृदुंग, हरिपाठाच्या गजरात माऊलींचे अश्व २० पेक्षा अधिक दिंड्या पार करत पुन्हा माऊलींच्या रथाकडे वळले. नारळ प्रसाद घेऊन अश्व रथाभोवती प्रदक्षिणा घालत अग्रभागी पोहोचले. हा सोहळा पाहून वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

यावेळी लोणंद ते तरडगांवपर्यंतच्या मार्गावर हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, परहर खुर्द, हिंगणगांव, रावडी, माळेवाडी, शिंदेमाळ आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच, पदाधिकाऱ्यांनी माऊलींचे स्वागत केले.

या आधी दुपारी २.३० वाजता सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करताच सरदेचा ओढा, कापडगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. या स्वागत सोहळ्यात आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, बाजार समिती संचालक प्रवीण खताळ यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी तरडगाव मुक्कामी पोहोचला.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments