
Tanishq Robbery CCTV: तनिष्कच्या शोरुममध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या आराह येथे हा दरोडा पडला आहे. सकाळी 10.30 वाजता शोरुम उघडताच 5 ते 6 जण आत घुसले आणि बंदुकीचा धाक दाखवत सुरक्षारक्षक, कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवलं. यानंतर तब्बल 25 कोटींचे दागिने चोरुन दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी त्यांनी काही रोख रक्कमही सोबत नेली, ज्याचा आकडा समोर आलेला नाही. हा सगळा दरोडा शोरुममधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये शस्त्रधारी दरोडेखोर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना दरोडा टाकताना हात वर ठेवायला सांगत आहेत. नंतर चोरीचा माल बॅगेत भरुन ते पळ काढतात.
आराह पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोपाली चौकातील तनिष्कच्या शाखेत हा दरोडा पडला. शोरूमचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रोख रक्कम, चेन, नेकलेस आणि बांगड्यांसारखे सोन्याचे दागिने तसेच काही हिऱ्यांचे तुकडे असा मोठा ऐवज लंपास केला.
सुरक्षारक्षक मनोज कुमार यांनी सगळा घटनाक्रम उलगडला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता शोरुम उघडलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. “सहा गुन्हेगार एका गाडीतून आले. त्यांनी रस्त्याच्या पलीकडे आपली गाडी पार्क केली. शोरूमच्या धोरणानुसार, आम्ही एकाच वेळी चारपेक्षा जास्त जणांच्या ग्रुपला आत जाऊन देत नाही. म्हणून आम्ही त्यांना जोडीने आत येण्याची परवानगी दिली. जेव्हा सहावा व्यक्ती आला तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर पिस्तूल धरले, माझे शस्त्र हिसकावून घेतले आणि माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर, त्यांनी त्यांच्या बॅगा दागिन्यांनी भरण्यास सुरुवात केली,” असं त्यांनी सांगितलं.
A group of robbers were caught on camera holding the staff and customers at gunpoint and robbing jewellery worth Rs 25 crores from a #Tanishq showroom in #Bihar‘s #Arrah. The robbers were later involved in an encounter with the police, which left two criminals injured.
The… pic.twitter.com/oZHWjdT0Zf
— Hate Detector (@HateDetectors) March 10, 2025
शोरुममधील कर्मचारी रोहित कुमार मिश्रा याने सगळे कर्मचारी जीव वाचवण्यासाठी काऊंटरच्या मागे लपले होते असं सांगितलं. सिमरन या कर्मचाऱ्याने आपण पोलिसांना फोन केला असता 600 मीटरवर पोलीस स्थानक असतानाही पोहचायला अर्धा तास लागेल असं सांगितल्याचा दावा केला आहे. आम्ही अर्ध्या तासात 25 ते 30 फोन केले असंही तिने सांगितलं.
दरोड्यानंतर भोजपूरच्या पोलिस अधीक्षकांनी सर्व स्टेशन प्रमुखांना वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी जिल्ह्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो प्रसारित करण्यात आले. या माहितीच्या आधारे, स्टेशन प्रमुखांनी त्यांच्या पथकासह बाबुरा छोटी पुलावर वाहनांची तपासणी सुरू केली. या कारवाईदरम्यान, तीन मोटारसायकलींवर सहा संशयास्पद पुरुष डोरीगंजच्या दिशेने वेगाने जाताना दिसले.
आम्ही थांबण्यास सांगितलं असता त्यांनी दुचाकीचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग केला असता दरोडेखोरांना पोलिसांवर गोळीबार केला. ज्यामुळे पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दोन पिस्तूल, 10 काडतुसं, चोरलेले दागिने आणि पल्सर बाईक जप्त केली आहे. कंपनी नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना मदत करत आहे.