Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रसमकाल: ओले मूळ भेदी...

समकाल: ओले मूळ भेदी…

समकाल: ओले मूळ भेदी…

[ad_1]

महेंद्र कदम2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सभोवती काही एक नितळ, निर्मळ घडत असतं. घडावं. घडवावं. आपल्या मनाच्या गाभाऱ्यातली ओल जागी ठेवावी. त्या ओलीनं काही बऱ्या गोष्टी घडाव्या. त्यात आपण मनापासून सहभागी असावं. त्यातलं काही आपल्यात रिचवून घ्यावं. आपली ओल अधिक समृद्ध करावी, निखळ मोकळा आनंद घ्यावा. निर्व्याज हसून घ्यावं. सुख-दु:खात रसरसून रमून जावं. सभोवतालचा माहोल टवटवीत करावा. असं वाटत नाही का कुणाला?

काही तरी आतून बिघडत चाललं आहे. सगळं आलबेल असल्याचा भास होतोय, पण सगळीकडून नुसता धूर सुटला आहे. अस्वस्थतेचा धुमस चालू आहे. सभोवती काहीच चांगलं घडत नसल्याचा अनुभव दररोज येतो आहे. काही बरं घडलं, तरी ते मनाच्या तळापर्यंत पोचत नाही. पोचलं तरी ते फार काळ टिकत नाही. सगळा माहोल विचित्र बनला आहे. घरात, बाहेर, समाजात सगळीकडं असून आपण कुठंही नसल्यासारखं झालेलो आहोत. मनाचा गाभारा कोरडाठक्क पडत चालला आहे. दुष्काळ सभोवती घिरट्या घालतो आहे. गिधाडांची फौज कधीची टपून बसली आहे. तरीही आपण काहीच करत नाही. करावसं वाटत नाही. बाहेरच्या माहोलाचं राहू द्या, किमान आपला आतल्या माहोलाची ओल जपायला हवी, असंही कुणाला वाटेनासं झालं आहे. तसं का झालं आहे, याची चिंता वाटावी अशी स्थिती आहे.

प्रत्येकाला मोकळा श्वास घेवून जगायचं आहे, पण तो मिळेनासा झाला आहे. कशासाठी सगळी धडपड चाललीय, कळायला मार्ग नाही. त्याच्या स्वत:च्या आनंदाचे क्षण त्याला सापडायला तयार नाहीत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि दुबळा दोघंही आत्यंतिक अस्वस्थ आहेत. माणूस सार्वजनिक जीवनात रमताना दिसत नाही. त्याचं इव्हेंट मशीन झालं आहे. म्हणजे लग्नं लागलं की अर्ध्या तासात मंडप रिकामा होतोय. आधीची चार – आठ दिवसांची पाहुण्यांची गडबड घरात दिसत नाही. कुठलाही कार्यक्रम दोन तासात संपवून सगळी आपापल्या वाटेला लागू लागलीत. कळसूत्री बाहुल्यांसारखी दिशाहीन धावताहेत. तुमचं – माझं मशीन बनून गेलं आहे. हे कशामुळं झालं आहे, काहीच कळायला मार्ग नाही.

एक उसादीन पोकळी भरून आहे प्रत्येकाच्या मेंदूत. तिचं काय करायचं कळत नाही. त्यातून मग अनेक जण नैराश्याच्या गर्तेत गेलेत. कधी नाही इतकी मानसोपचारतज्ज्ञांची गरज वाटू लागली आहे. त्यातूनही प्रश्न सुटत नाहीत. प्रश्नांचं मोहोळ प्रत्येकाच्या मनात आणि घराभोवती घोंगावतं आहे.

बालपणी आपण कितीतरी किरकोळ गोष्टीत आनंद शोधून मस्त जगत होतो. दारिद्र्य, अवहेलना, उपेक्षा पाचवीला पुजलेली होती. पोटाच्या लढाया तेव्हाही सोप्या नव्हत्या. पण, माणूस माणसांत होता. पीठा- मीठाचं, पेनमधल्या शाईच्या थेंबांचंही उसनंपासनं व्हायचं. एकमेकांना देण्यासारखं फारसं काहीच नव्हतं, फक्त हाती हात होते. आता देण्यासारखं असूनही कोणी कोणाला काही देत नाही. भरल्या ओंजळी रिकाम्या दिसताहेत. म्हणून तर तत्कालीन व्यवस्थेला विरोध करणारे आणि वज्रासारखे कणखर असणारे तुकोबा मेणाहून मऊ होते. त्यांना काळ्याकुट्ट खडकाला भेदून उगवणारा कोवळा पिंपळ दिसला. एका अत्यंत लुसलुशीत, आर्त ओलीने खडकपण पाझरतो, हे तुकोबांना माहीत होतं, म्हणून ते लिहितात… ओले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासासी संग कार्यसिद्धी॥ या ओलीनेच त्यांनी दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून पिंपळाचा धर्म जगवला होता. निसर्गातली ही पाझरण्याची, माणुसकी अंथरण्याची गोष्ट आजचा माणूस कुठं तरी हरवून बसला आहे. आणि ती शोधण्याचा रस्ता त्याला सापडत नाही.

रशिया- युक्रेन, इस्त्राइल- हमास यांच्यात माणसं मारण्याचा आणि माणसांनीच उभ्या केलेल्या ऐश्वर्याला सुरूंग लावण्याचा जो संहारक खेळ सुरू आहे, त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही. ईशान्य भारतात जे अस्वस्थतेचं पर्व सुरू आहे, त्याबद्दल कुणी गांभीर्यानं बोलत नाही. मागच्या काही दिवसांत मलकापूरला झालेली दंगल पूर्वनियोजित होती, असं पुढं आलं. अशा दंगली घडल्या की, माणसं तिथल्या दु:खावर अथवा मृतांच्या जगण्यावर न बोलता थेट जजमेंटल होऊन कोण किती चुकीचा होता, कुणाचं बरोबर, यावरच चर्चा करायला लागतात. माणूस मरतो आहे, याचंही भान आम्ही विसरुन गेलो आहोत का? माणसातली ओल आटत चाललीय का? मान्य आहे की, खेड्यापाड्यात जातीयता होती आणि आहेही; पण तिथे जी ओल होती, तीही आता वेगाने सुकत चालली आहे. हे ओल आटत जाणं आपल्याला परवडणारं नाही.

(संपर्क : ९०११२०७०१४, mahendrakadam27@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments