Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'आर्थर लाल' संघर्षाकडून संयमाकडे नेणारा शांतिदूत

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘आर्थर लाल’ संघर्षाकडून संयमाकडे नेणारा शांतिदूत

वेध मुत्सद्देगिरीचा…:  ‘आर्थर लाल’ संघर्षाकडून संयमाकडे नेणारा शांतिदूत

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी42 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जागतिक राजकारण म्हणजे संघर्ष आणि संघर्ष हा समज अधिकाधिक दृढ होत असल्यामुळे त्याच्या संकल्पनेतही बदल होत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकारणातील मुत्सद्देगिरीची संकल्पना. वास्तविक मुत्सद्देगिरीचे खरे कर्तव्य हे युद्धाला गौरवशाली बनवणे नव्हे, तर शांततेचा मार्ग प्रस्थापित करणे हे असते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत या मूलभूत कर्तव्याची जाण ठेवणारा मुत्सद्दी अधिकारी म्हणजे आर्थर लाल. राजदूत, कवी, लेखक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पडताना त्यांनी आपल्यातील शांतिदूताचे कधीच विस्मरण होऊ दिले नाही.

१९११ मध्ये लाहोरच्या एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या आर्थर यांनी फाळणीनंतर भारतात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. १९५४ ते ५९ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली. जागतिक राजकारणातील हा काळ अत्यंत प्रतिकूल असा होता. १९४५ मध्ये अमेरिकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने संघर्षाचा मूलभूत ढाचाच बदलून गेला होता. १९४९ मधील सोव्हिएत महासंघाच्या अण्वस्त्र चाचणीनंतर कधी नव्हे इतका धोका मानवी अस्तित्वासमोर निर्माण झाला होता. या दोन्ही महासत्तांच्या संघर्षात संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. थोडीशी चूक देखील विनाशाला आमंत्रण देणारी ठरू शकते, अशा काळात आर्थर यांनी संयुक्त राष्ट्रांत प्रवेश केला होता. परंतु, मुत्सद्देगिरीच्या मूल्यांशी संपूर्णपणे परिचित असणाऱ्या आर्थर यांनी या आव्हानाला संधी मानून संयुक्त राष्ट्रे म्हणजे काय, हे आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.

क्युबन क्षेपणास्त्राचा पेच म्हणून प्रसिद्ध असलेल्या घटनेने १९६२ मध्ये जगाला पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून १९६२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने निःशस्त्रीकरण परिषद आयोजित करण्यात आली होती. अठरा देशांचा सहभाग असणाऱ्या या परिषदेत आर्थर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. अपघाताने, गैरसमजुतीने किंवा संवादाअभावी निर्माण झालेल्या युद्धाची व्याप्ती कमी करण्यासाठी या परिषदेत तयार करण्यात आलेला मसुदा आजही तितकाच परिणामकारक आहे. त्या काळात जागतिक शांततेसाठी भारत घेत असलेल्या भूमिकेचे प्रतिबिंब ही या मसुद्यात दिसून येते. आर्थर यांनी अमेरिका आणि सोव्हिएत महासंघाच्या दरम्यान सुरू असलेल्या ‘स्ट्रॅटजिक आर्म्स लिमिटेशन टॉक्स’(सॉल्ट) या पुढाकारातही कृतिशील सहभाग नोंदवला. याच चर्चेने शीतयुद्धात थोडीफार शिथिलता आणण्याचे काम केले होते. अण्वस्त्रामुळे जागतिक राजकारणावर येणाऱ्या संकटाची कल्पना आर्थर यांना आली होती, तसेच त्यातील धोक्यांची जाणीवही झाली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अण्वस्त्रविरोधी भूमिका घेतली. किंबहुना शस्त्रास्त्र नियंत्रणासाठीच त्यांनी आपली मुत्सद्देगिरी पणाला लावली. विशेष म्हणजे, आर्थर यांनी १९६३ मध्ये शस्त्रास्त्र नियंत्रणातील तज्ज्ञ असलेल्या बेटी गोएट्ज यांच्याशी विवाह केला.

परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यावरही आर्थर यांनी जागतिक शांततेप्रति असलेली आपली निष्ठा निरंतर ठेवली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या विभागात शिकवण्यास सुरूवात केली. या काळात त्यांनी ‘मॉडर्न इंटरनॅशनल निगोशिएशन : प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस’ या आपल्या पुस्तकात जागतिक संघर्षाचे निराकारण आणि शांतता प्रस्थापनेतील संवादाचे महत्त्व विषद केले. संयुक्त राष्ट्रांची स्थायी परिषद, ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेटस्, अरब लीग, कॉमन वेल्थ नेशन, छोट्या देशांतील संघर्षाचे शांततामय निराकरण, जागतिक राजकारणात प्रसिद्ध असणाऱ्या उत्तर-दक्षिण विषमतेचा उगम आणि त्याची कारणे, त्यावरील उपययोजना या सर्व महत्त्वाच्या विषयांवर लाल यांनी अत्यंत मूलभूत, तितकीच उपयुक्त मांडणी केली आहे. इतकेच नव्हे, सध्या सुरू असलेल्या अरब-इस्त्रायल संघर्षात असलेले बहुपक्षीय शिष्टाईचे महत्त्वही त्यांनी त्या काळात विषद केले होते. अमेरिका कितीही बलाढ्य देश असला, तरी अरब-इस्त्रायल सारख्या संघर्षाचे निराकरण करणे त्याला अशक्य आहे. त्यासाठी जबाबदार घटकांनी एकत्र येऊनच हा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी भूमिका लाल यांनी मांडली होती. १९४५ ते १९९१ हा काळ जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक होता. त्या काळात जागतिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक संघटनांचे महत्त्व, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या मर्यादा, संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी आणि कर्तव्ये हा त्यांचा चिंतनाचा गाभा होता.

१३ सप्टेंबर १९९८ ला न्यूयॉर्क येथे लाल यांचे निधन झाले. ३१ सप्टेंबर १९९८ या दिवशी प्रख्यात स्तंभलेखक बार्बरा क्रोसेट यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लाल यांच्या कार्यावर लेख लिहिला. जागतिक राजकारणातील अभ्यासकांनी त्यांच्या पुस्तकांवर लिहिलेली अनेक परीक्षणे प्रसिद्ध झाली. परंतु, भारतात मात्र या शांतिदूताच्या वाट्याला विस्मरणाची शोकांतिकाच आली.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments