Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रखलनिग्रहणाय: राष्ट्रनिर्माण आणि पोलिसांचे दायित्व

खलनिग्रहणाय: राष्ट्रनिर्माण आणि पोलिसांचे दायित्व

खलनिग्रहणाय:  राष्ट्रनिर्माण आणि पोलिसांचे दायित्व

[ad_1]

डॉ. भूषणकुमार उपाध्याय6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रनिर्माणातील पोलिसांच्या सकारात्मक सहभागाच्या दिशेने आपली वाटचाल व्हायला हवी. सरदार पटेल म्हणायचे की, पोलिसांचे काम फक्त गुन्हे रोखणे आणि ते उघडकीस आणणे नाही, तर एखाद्या सामान्य माणसाच्या आत्मसन्मानाची, हिताची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातूनच प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल आणि आपला देश एक मजबूत राष्ट्र बनेल.

‘राष्ट्र’ ही एक अशी सार्वभौम सत्ता आहे, जिच्याशी तेथील नागरिक भावनिकदृष्ट्या एकात्म झालेले असतात. अशा राष्ट्राच्या निर्माणामध्ये पोलिसांची मोठी भूमिका असते. पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे काम कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आहे. ती नीट राहिली तरच राष्ट्र प्रगती करु शकते. ते सर्व क्षेत्रांत समृद्ध होऊ शकते. पोलिसांची दुसरी मोठी जबाबदारी म्हणजे गुन्हेगारीला लगाम लावणे. त्यामुळे समाजात गुन्हे घडले, तर ते तातडीने उघडकीस यायला पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षाही झाली पाहिजे. देशांतर्गत राष्ट्रविरोधी कारवायांना आळा घालणे हीसुद्धा पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. समाजामधील विविध घटकांमध्ये सौहार्द आणि सामंजस्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी वातावरण तयार करणे, ही पोलिसांची प्रमुख भूमिका आहे. लोकांच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करतानाच; गरीब, वंचित, पीडित घटकांच्या अधिकारांचे संरक्षण, संवर्धन करणे, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्तींच्या हिताची सुरक्षा करणे आणि त्यांच्यात विश्वास संपादन करणे या गोष्टींना पोलिसांनी प्राधान्य दिले पाहिजे.

उपरोक्त जबाबदाऱ्या एक सक्षम आणि निष्पक्ष पोलिस यंत्रणाच पार पाडू शकते. यासाठी प्रचलित कायद्यानुसार पोलिसांनी वागावे, हे अपेक्षित आहे. निष्पक्षपणे काम करण्यासाठी त्यांना तसे स्वातंत्र्यही दिले पाहिजे. पोलिस यंत्रणेच्या गैरवापराने काही ठराविक लोकांना आणि राजकीय पक्षांना तत्काळ फायदा मिळू शकतो, पण यातून शेवटी राष्ट्राचे नुकसान होते. ज्या ज्या देशांमध्ये सध्या अराजकाची स्थिती आहे, तिथली पोलिस यंत्रणाही अत्यंत ढिसाळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणेमध्ये सर्व जाती, धर्म आणि समुदायांचे योग्य प्रतिनिधित्व असणेही गरजेचे आहे. शिवाय, या विभागात महिलांची संख्याही वाढली पाहिजे. पोलिस संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब या दलामध्ये उमटले पाहिजे. अशी पोलिस यंत्रणाच सर्वसमावेशक होऊन राष्ट्रनिर्माणामध्ये मोठी भूमिका बजावू शकते.

आपल्या देशातील पोलिसांचा इतिहास पाहता अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात. ही पोलिस यंत्रणा इंग्रजांनी सुरू केलेली आहे. त्यांचे साम्राज्य कायम ठेवण्यासाठीच त्यांनी ही यंत्रणा बनवली आणि चालवली. त्यामध्ये जनहित आणि जनकल्याणाची काहीही भावना नव्हती. कमी पगार, भ्रष्टाचार आणि दडपशाही म्हणजे त्या काळातील पोलिस. स्वातंत्र्योत्तर काळातही अशी यंत्रणा कायम राहिली. आजही बहुतांश कायदे त्या काळातील आहेत. पोलिस यंत्रणेत बऱ्याच प्रमाणात सुधारणा करण्यात आली असली, तरी अजूनही सामान्य जनतेला पोलिस हा आपला मित्र वाटत नाही. पोलिसांकडील बहुतांश कामे पैसे आणि वशिल्याशिवाय होत नाहीत, असा लोकांचा अनुभव असतो. त्यामुळे आता पोलिस यंत्रणेत आमूलाग्र बदल व्हायला हवा. पोलिसांचे पगार, राहणीमान आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा झाल्या पाहिजेत.

राजकीय नेत्यांचे ऐकले नाही तर ते आपली बदली करुन टाकतील म्हणून बहुतांश पोलिस अधिकारी आणि अंमलदार त्यांना घाबरतात. काही पोलिस अधिकारी राजकारणी मंडळींच्या हाताचे बाहुले झालेले असतात. पोलिस राजकारणी लोकांच्या दडपणाखाली काम करत असतील, तर राष्ट्रानिर्माणामध्ये ते अपेक्षित योगदान देऊ शकणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. वास्तविक पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावे, यासाठी त्यांच्या नेमणुका तसेच बदल्यांबाबत नियम करणे आणि त्या ज्येष्ठता व कार्यक्षमतेच्या आधारे होणे अनिवार्य आहे. पोलिसांचा निष्पक्षपातीपणा टिकवण्यासाठी याशिवाय काही पर्याय नाही.

स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास पाहता एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की, ज्या ज्या राज्यांत पोलिस यंत्रणा सक्षम राहिली, राजकीय हस्तक्षेप कमी होता, तिथे कायदा आणि सुव्यवस्थाही चांगली राहिली. त्या राज्यात गुन्हेही नियंत्रणात राहिले. परिणामी ते राज्य विकासामध्ये खूप पुढे गेले आणि त्याने सर्वच क्षेत्रांत चांगली प्रगती केली. आपला महाराष्ट्र हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. याउलट ज्या ज्या राज्यांत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली नाही, तिथे उद्योग- व्यवसाय वाढले नाहीत, परिणामी ती राज्ये मागे राहिली. पोलिस यंत्रणेमध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजेत, याबाबत नॅशनल पोलिस कमिशनने विस्तृत अहवाल दिला आहे. तथापि, त्यानुसार अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रकाशसिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देशही फार उपयोगी पडले नाहीत. सध्याचा काळात या महत्त्वाच्या विषयावर गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जगाचा विचार केल्यास, सर्व प्रगत आणि लोकशाही असलेल्या राष्ट्रांमध्ये पोलिसांची भूमिका फारच महत्त्वाची ठरली आहे. तिथल्या पोलिसांविषयी लोकांना असलेला विश्वास, तसेच पोलिसांची लोकांसोबतची वागणूक यांमुळे सामाजिक स्थितीमध्ये कमालीची सुधारणा झाली. बऱ्याच देशांमध्ये काही घटना घडल्यास पोलिसच स्वत:हून लोकांच्या घरी जातात, लोक तक्रार द्यायला पोलिस स्टेशनला येत नाहीत. लोकांशी ते अतिशय विनम्रपणे आणि सन्मानाने बोलतात. पण, हेच पोलिस गुन्हेगाराला मात्र तितक्याच कठोरपणे हाताळतात.

राष्ट्रनिर्माणातील पोलिसांच्या सकारात्मक सहभागाच्या या दिशेने आपली वाटचाल व्हायला हवी. सरदार पटेल म्हणायचे की, पोलिसांचे काम फक्त गुन्हे रोखणे आणि ते उघडकीस आणणे नाही, तर एखाद्या सामान्य माणसाच्या आत्मसम्मानाची, हिताची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातूनच प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल आणि आपला देश एक मजबूत राष्ट्र बनेल.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments