- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article Written By Neerja On Art Folk Art Classical
नीरजा9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कोणत्याही देशाची, प्रांताची संस्कृती म्हणजे केवळ धर्म आणि कर्मकांडं नसतात, तर त्या त्या संस्कृतीत उदयाला आलेल्या विविध कला, लोककला, शास्त्रीय तसेच लोकसंगीत आणि मुख्य म्हणजे, भाषा आणि त्यातून जन्माला आलेलं साहित्य, तत्त्वज्ञानही हेही असतं, हे विसरत चाललेल्या समाजात सध्या आपण राहत आहोत. देशाच्या सांस्कृतिक वस्त्राची वीण उसवत जाण्याच्या या काळात ती अधिकाधिक घट्ट करण्यासाठी आंतरभारतीची गरज आहे, हे साने गुरुजींनी स्वातंत्र्यपूर्व काळातच ओळखले होते. आणि म्हणूनच त्यांनी ‘आंतरभारती’ची कल्पना मांडली.
या देशाला एकसंध ठेवायचं असेल, तर इथल्या विविध कला आणि साहित्याच्या छटा समजावून घेत त्या एकमेकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून साने गुरुजींनी स्वतःही अनुवादाचं काम हाती घेतलं होतं. कारण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद होत असतो, तेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृतींचाच अनुवाद होत असतो आणि त्यांच्यात संवादही होत असतो. जगभरातून जे जे साहित्य अनुवादाच्या साहाय्यानं आपल्यापर्यंत पोचलं, त्या साहित्यानं जगभरातील लोकांच्या जगण्याच्या विविध अंगांशी, त्यांच्या प्रश्नांशी, त्यांच्या वेदनेशी आपली ओळख करून दिली. शेक्सपिअर, इलियट, टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, बेकेट, नेरूदा, आक्ताव्हिओ पाझ, गॅब्रिअल गार्सिय मार्केस, सारामागो यांसारख्या अनेक लेखकांनी जगभरातील वाचक घडवला आणि त्यातूनच जगण्याचे अनेक पदर उलगडणारे साहित्यिकही निर्माण झाले.
अनुवादात संवाद घडवण्याची ताकद असतेच, पण तो भाषाभाषांमध्ये पूलही बांधतो, हे सांगणाऱ्या साने गुरुजींच्या कर्मभूमीत या वेळी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले, ही खरे तर आनंदाची गोष्ट. पण, या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत ‘अलक्षित साने गुरुजी’ आणि ‘आंतरभारती काल-आज-उद्या’ अशा दोन परिसंवादांपलीकडे विशेष नावीन्य असलेले विषय नाहीत. केवळ साने गुरुजींच्या १२५ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अमळनेरला संमेलन घेतले आणि पर्यायाने हे दोन विषय आले आहेत, एवढाच काय तो बदल.
आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात आजच्या तरुण पिढीला नेमकं काय हवं आहे, कसदार लेखन म्हणजे नेमकं काय, याविषयी चर्चा करणारे परिसंवाद फारसे दिसत नाहीत. असं लेखन होण्यासाठी साहित्यिकांना मोकळा अवकाशही मिळायला हवा. त्यांना लेखनातून व्यवस्थेला प्रश्न विचारता आले पाहिजेत, याचा विचार न करणाऱ्या सरकारच्या काळात मग साहित्य संमेलनाच्या मंचावर मोठ्या संख्याने राजकीय नेते उपस्थित राहतात. संमेलनात राजकारणी हवेत की नाही, हा वाद जुनाच आहे. पण अलीकडच्या काळात त्यांची संख्या वाढून जगण्याविषयी तसेच आजच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक वास्तवाविषयी स्वतःची अशी भूमिका असणाऱ्या आणि ती बेधडकपणे मांडणाऱ्या विविध भाषांतील लेखक-लेखिकांना उद्घाटनासाठी किंवा समारोपासाठी बोलावण्याची पद्धत बाद झाली आहे की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे.
अलीकडेच भरलेलं विश्व मराठी संमेलन, जागतिक मराठी संमेलन आणि हे संमेलन यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली, तरी लक्षात येतं की अगदी थोडे अपवाद वगळता सुमारांची सद्दी सुरू झाली आहे. वैचारिक, सामाजिक, राजकीय भान व्यक्त करणारं आणि व्यवस्थेची लक्तरं वाचकांसमोर मांडून त्यावर विचार करायला लावणारं प्रयोगशील लेखन करणारे आणि आपल्या साहित्यकृतीतून सरकारला प्रश्न विचारणारे लेखक मंचावर फारसे दिसत नाही. अर्थात मंचावर नसले, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसारमाध्यमांपासून दूर असे अनेक लेखक निष्ठेनं लिहित आहेत, ही आशेची गोष्ट आहे. त्यांच्यापर्यंत संमेलनांचे आयोजक आणि प्रसारमाध्यमे पोहोचली नाहीत, तरी वाचक बऱ्यापैकी पोहोचत आहेत. या वर्षीचं साहित्याचं नोबेल मिळालेले नॉर्वेजिअन नाटककार, कवी, कादंबरीकार आणि अनुवादक योन फॉसे यांनी, ते कुठल्या उर्मीतून लिहितात हे ‘द न्यूयॉर्कर’ला दिलेल्या मुलाखतीत कथन केले. आपण एक तर अज्ञात अरण्यातून लिहितो आणि दुसरं म्हणजे धाडसातून. आपल्या दृष्टीनं या अरण्यातली ती जागा आतला आवाज ऐकण्यासाठी असते, असे ते म्हणतात. ‘लिहिताना मला माझ्या मनाच्या काठावर जावं लागतंच, पण त्याच्या सीमा ओलांडूनही जावं लागतं. आणि तुम्ही कमकुवत असाल, तर हा काठ ओलांडणं जास्त घाबरवणारं असतं..’ असे ते सांगतात. आज केवळ या देशातील लोकांमध्येच नाही, तर लेखकांमध्येही एक प्रचंड मोठा वर्ग असा आहे की त्याला हे अरण्य असतं हेच माहीत नाही आणि असलं तरी त्यात शिरण्याचं धाडस करण्याची ताकदही नाही. सरकारला आवडेल ते लिहिण्या-बोलण्याकडे कल वाढण्याच्या या दिवसांत समृद्ध, प्रयोगशील साहित्याचे कुपोषण होणे स्वाभाविकच. मग अशा काळात साहित्य संमेलन हासुद्धा केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणूनच साजरा होतो. कदाचित पुढील काळात या पलीकडे जाणारे, अरण्यात प्रवेशून अज्ञाताचा शोध घेणारे साहित्यिक निर्माण होतील, अशी आशा करूयात. आणि त्यासाठी वेगवेगळ्या भाषांत काय चालले आहे, हे अनुवादाच्या मार्फत समजून घ्यायला हवे.
संपर्क
नीरजा
}सामाजिक, राजकीय भान व्यक्त करणाऱ्या लेखिका.
}६ काव्यसंग्रह, ४ कथासंग्रह, एक कादंबरी प्रकाशित
}‘साने गुरुजी ट्रस्ट’च्या अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्ष
nrajan20@gmail.com






