प्रशांत केणी3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडकडून ०-३ असा लाजिरवाणा पराभव पत्करला. या ‘व्हाइट वॉश’नंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली असे संघातील दिग्गज खेळाडू टीकेच्या लक्ष्यस्थानी सापडले आहेत. या मालिकेत भारताचे नेमके काय चुकले, याचा हा लेखाजोखा…
रोम जळत होते, तेव्हा नीरो फिडल वाजवण्यात गर्क होता.. हे एक ऐतिहासिक सत्य. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नेहमीच याचे उदाहरण दिले जाते. नेमके तसेच काहीसे भारतीय क्रिकेटमध्ये घडते आहे. एकीकडे कसोटीसारख्या सर्वोच्च क्रिकेट प्रकारात भारतीय संघाने न्यूझीलंडकडून ०-३ असा मानहानिकारक पराभव स्वीकारला. या पानिपताचे शोकपर्व सुरू असताना भारतीय क्रिकेटच्या दृष्टिकोनाचे वाभाडे निघणे स्वाभाविकच आहे. परंतु, त्यातून बोध घेण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ‘आयपीएल’ची लिलाव प्रक्रिया अरबांच्या देशात आयोजित करण्यात मश्गूल आहे. हीच ती ‘नीरोवृत्ती’.
झटपट सामन्यांची कसोटीवर कुरघोडी न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी, कसोटी क्रिकेट सामना पाच दिवसांचा करावा, अशी मागणी केली. गेल्या पाच वर्षांत भारतात झालेल्या २५ कसोटी सामन्यांपैकी २० सामने पाचव्या दिवसापर्यंत टिकलेच नाहीत. याचप्रमाणे जागतिक स्तरावरील सामन्यांचे विश्लेषण केले, तर १२७ कसोटींपैकी ७६ सामने चार किंवा कमी दिवसांतच निकाली निघाले आहेत. हे असे का घडते आहे? …तर याचे उत्तर ‘आयपीएल’ आणि जगभरात होणाऱ्या लीग क्रिकेटमध्ये दडले आहे. खेळपट्टीवर टिकाव धरून चिवट फलंदाजी करु शकणारे फलंदाज घडणे जसे कमी झाले आहे, तसे कसोटी क्रिकेटला साजेसे गोलंदाजही तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उलट लीगमुळे दुखापतींचे प्रमाण वाढल्याने हार्दिक पंड्यासारखे चार षटकांचे गोलंदाज मोठ्या प्रमाणात उदयास येऊ लागले आहेत.
अतिआत्मविश्वासाची धुंदी नडली भारत-न्यूझीलंड मालिकेआधी भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका २-० अशी आरामात खिशात घातली होती, तर किवी संघ श्रीलंकेतून ०-२ असा दारुण पराभव पत्करून आला होता. त्यामुळे मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका म्हणजे एकापेक्षा एक यशोगाथा साकारतील, जणू अशाच अतिआत्मविश्वासाच्या धुंदीत भारतीय संघ होता. फिरकीच्या तालावर न्यूझीलंडचे फलंदाज केवळ हजेरीवीर ठरतील, अशी खात्री मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना होती. पण, बेंगळुरुमध्ये ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाजांना साथ मिळाली आणि भारतीय संघ पहिल्या डावात फक्त ४६ धावांत गारद झाल्यावर सर्वांचे डोळे खाडकन् उघडले. ही पहिली कसोटी न्यूझीलंडने आठ गडी राखून जिंकली.
फिरकीच्या सापळ्यात आपलीच शिकार या घातचक्रातून भारताचा संघ बाहेर पडावा, यासाठी फिरकीचे सापळे रचण्यात आले. पण, भारतीय फलंदाजांचीच यात शिकार झाली आणि ही जिंकण्याची आशा मग धूसर ठरू लागली. न्यूझीलंडच्या एजाझ पटेल (१५ बळी), मिचेल सँटनर (१३ बळी) आणि ग्लेन फिलिप्स (८ बळी) या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. भारताने या वर्षाच्या पूर्वार्धात इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यावेळी भारतीय फलंदाजांची फिरकीविरुद्धची सरासरी ३९.९ धावा अशी होती. पण, न्यूझीलंडविरुद्ध ही सरासरी २४.४ धावा अशी चिंताजनक ठरली. एकंदर मालिकेत भारताचे ३७ फलंदाज फिरकीपुढे गारद झाले. पुण्याच्या दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी, तर मुंबईच्या तिसऱ्या कसोटीत २५ धावांनी न्यूझीलंडने विजय मिळवत भारताला ‘व्हाइट वॉश’ दिला. जे घडत होते, त्यावर विश्वास बसणे कठीण होते. केन विल्यमसनशिवाय आलेल्या टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने ‘न भूतो’ असा पराक्रम गाजवला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रोहित, विराटच्या क्षमतेची ‘कसोटी’ प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित खेळपट्टीचा अंदाज घेण्यात वारंवार चुकले. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजीचे सूत्र रोहितला या मालिकेत योग्य पद्धतीने जपता आले नाही. २, ५२, ०, ८, १८, ११ या रोहितच्या सहा डावांतील धावा. यात बेंगळुरुमधले एकमेव अर्धशतक. १५.१७ च्या सरासरीने एकूण ९१ धावा काढणारा रोहित वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही माऱ्यापुढे टिकाव धरू शकला नाही. जी कथा रोहितची, तीच विराटची. ०, ७०, १, १७, ४, १ या विराटच्या सहा डावांतील धावा. विराटने १५.५० च्या सरासरीने एकूण ९६ धावा काढल्या. त्याचेही एकमेव अर्धशतक बेंगळुरुतले. ही खेळी वगळल्यास विराटच्या अन्य डावांतील सरासरी जेमतेम ४.६ धावांची राहिली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराट धावांसाठी झगडताना दिसत होता. परिणामी विश्वविजेतेपदानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या रोहित (वय ३७) आणि विराट (वय ३६) यांनी आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पंड्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी शिस्तीचा बडगा दाखवणारे ‘बीसीसीआय’ रोहित-विराटची मर्जी सांभाळून, वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण दाखवत त्यांना विश्रांती देत असतेच. पण, त्यांनी वर्षाला काही रणजी सामने खेळावेत, अशी अट घालण्यास मात्र धजावत नाही.
या स्थितीत आगामी ऑस्ट्रेलियाचा प्रदीर्घ दौरा या वरिष्ठांसह एकूणच भारतीय संघासाठी अग्निपरीक्षेचा ठरेल. भारताचा टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मार्ग आता आणखी बिकट झाला आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील चार सामने जिंकावे लागतील. भारताने ऑस्ट्रेलियाच्या या आधीच्या दोन दौऱ्यांतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे. पण, मोहम्मद शमीची दुखापत आणि संघाचा सध्याचा एकूणच फॉर्म पाहता हे आव्हान अवघड आहे. त्यामुळे कामगिरी सुधारण्याचे दडपण वरिष्ठ क्रिकेटपटूंवर असेल. भारतीय संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एका अर्थाने दिलेला सल्लाच महत्त्वाचा आहे.
कसोटी खेळाडू घडवावे लागतील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तळाच्या फलंदाजांवर विसंबून राहणे धोक्याचे ठरले. शिवाय, रविचंद्रन अश्विन (वय ३८) आणि रवींद्र जडेजा (वय ३६) या फिरकी जोडगोळीची कारकीर्दही अस्ताकडे वाटचाल करीत आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यापेक्षा उत्तमोत्तम क्रिकेटपटू सध्या भारताकडे आहेत, ही गर्जना आपण आधीच करून टाकली आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत यांनी कसोटी क्रिकेटला साजेसा खेळ केला; पण हे सातत्य के. एल. राहुल, सर्फराज खान यांच्यात दिसून आले नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटच्या प्रचलित देशांतर्गत सामन्यांच्या पद्धतीत बदल करून दर्जेदार कसोटी क्रिकेटपटू घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
(संपर्कः prashantkeni@gmail.com)





