
- प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
- अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे,जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता.जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो,आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे,आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे,ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन…




