सातारा : राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून माणचे भाजपआमदार जयकुमार गोरे (Jaykumar gore) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje nimbalkar) यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता रामराजेंवर बोचरी टीका केली होती. आता, एका कार्यक्रमानिमित्ताने बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना चक्क शुभेच्छा दिल्या आहेत. गोरेंसोबत माझी वैयक्तिक कोणतेही भांडण नसल्याचे सांगत त्यांनी गोरगरिबांसाठी सत्तेचा चांगला वापर करुन गरिबांची कामे करावीत, असे त्याला सांगण्याचा मला आधिकार असल्याचे म्हटले. साताऱ्याच्या (Satara) फलटण येथील कोळकी येथे एका विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर बोचरी टीका केली होती. ‘देवेंद्र पावले, नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा,नीट वागा… अशी जहरी टीका गोरे यांनी केली होती. जयकुमार गोरे यांच्या या टिकेला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. मी माझ्या तोंडाला सेन्सॉरशिप लावली आहे, योग्यवेळी ती उठेल. सध्या मला धमक्या येत आहेत, पण मला सिक्युरिटी नाही, मी आपला एकटा फिरतोय, असे रामराजे यांनी म्हटलं. तसेच, मंत्री जयकुमार गोरे यांचे माझे वैयक्तिक वैर नाही, योग्यवेळी त्यांना सर्व काही सांगेन, अशा शब्दात रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना उत्तर दिलं.
रणजीतसिंह निंबाळकरांवर टीका
धोम बलकवडी नसताना काय झाले हे आत्ताच्या तरुण पिढीला माहित नाही. ज्यांना पैसे खायचे त्यांना खाऊ द्या, त्यांना जुलाब लागतील. त्याशिवाय त्यांचे पैसे खायचे सुटणार नाही. बरं झालं पिसाळलेली कुत्री गेली त्यांचं नाव परत काढू नका स्टेजवर. हे दहशतीचे दिवस आहेत, पोलीस काय करतात हेही माहित आहे. कोणाला कसे अडवले जाते हेही माहित आहे. काही दिवसापूर्वी जो खून झाला तो कोणी केला हे मला माहित आहे मी आत्ता बोलणार नाही. यांना वाय (Y) सिक्युरिटी (कपाळावर हात मारून) धमक्या मला येतात. मी आपला एकटा फिरतो आणि सिक्युरिटी यांना असे म्हणत नाव न घेता माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर रामराजेंनी टीका केली.
माझ्या तोंडाला सध्या सेन्सॉरशिप
जयकुमार गोरे आणि माझे काही वैयक्तिक भांडण नाही, गोरे यांच्या मनात जे आहे ते सगळे मीच करतो, देवाने त्यांना सद्बुद्धी देवो, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मंत्री व्हावे, संत्री व्हावे फक्त गरिबांसाठी काम करा, सत्तेचा वापर चांगला करा. माझं वय झालं आहे, माझं जयकुमार गोरेंना चांगलं सांगणे आहे, हा माझा अधिकारच आहे. त्यावेळी काय फासे पडले हे माहित नाही. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय अडी निर्माण झाली आहे मी योग्य वेळी सांगणार, आज नाही बोलणार. माझ्या तोंडाला सध्या सेन्सॉरशिप लावली आहे, ती योग्यवेळी उठवणार असे रामराजे यांनी म्हटले. तसेच, मला आज कार्यक्रमाला यायचा मूड नव्हता, मला मॅच बघायची होती, मी रम्मी बघत मॅच बघत नाही, असे म्हणत कृषिमंत्र्यांना टोलाही लगावला.
हेही वाचा
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता…..
आणखी वाचा