माझ्या हिश्श्याचे किस्से: दुर्घटना रोखण्यासाठी केबलला लटकले; राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन अशोक मेहतांचे 9 भाषांवर होते प्रभुत्व

0
14
माझ्या हिश्श्याचे किस्से:  दुर्घटना रोखण्यासाठी केबलला लटकले; राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन अशोक मेहतांचे 9 भाषांवर होते प्रभुत्व


रूमी जाफरी, बॉलीवूड लेखक-दिग्दर्शक55 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अशोक मेहतांना ‘३६ चौरंगी लेन’ सिनेमासाठी ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफर’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

या आठवड्यासाठी मी कॉलम लिहायला बसलो, तेव्हा मला अशोक मेहताजींची आठवण आली. वाटलं की, आपण सिनेमाच्या कॅमेरामनबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. अशोकजींवर लिहिलं पाहिजे, असा मनात विचार आला. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज अशोक मेहता यांच्याबद्दल…

अशोकजींनी मला सांगितले होते की, त्यांचा जन्म काबुलमध्ये झाला आणि बालपणीचे शिक्षण पश्तू आणि पारशीमध्ये झाले होते. तेरा – चौदाव्या वर्षी ते घरातून कसेबसे बाहेर पडले आणि मुंबईत पोहोचले. येथे येऊन खूप कष्ट केले. शाळा-कॉलेजात जाऊ शकले नाहीत; पण आयुष्याच्या अनुभवाची शिकवणी मात्र कमी वयातच सुरू झाली.

अशोकजींनी सांगितले की, मी स्टेशनबाहेर, फूटपाथवर, दारूच्या दुकानासमोर उकडलेली अंडी विकायचो. नंतर आशा स्टुडिओत नोकरी केली आणि पुढे श्रीकांत स्टुडिओमध्ये कॅन्टीन बॉय झालो. त्यानंतर ऑफिस बॉयही झालो. नंतर सुतारकामातील गोष्टी आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखी कला विभागाशी संबंधित सर्व कामे केली. मी लहानपणापासून खूप मेहनती होतो. कोणतेही काम मी लहान किंवा मोठे मानत नव्हतो. मी जगण्यासाठी काम करत होतो आणि जे काही करत होतो, ते मला खूप कामी आलेे.

अशोकजी पुढे सांगत होते.. ऑफिस बॉय झाल्यावर मी कॅमेरा अटेंडंट झालो. मग सुदर्शन नाग यांचा चीफ अटेंडंट बनलो. राज मारब्रोस हे एक दिग्दर्शक होते. “द विटनेस’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. पण, तो रिलीज झाला नाही. त्यात शशी कपूर अभिनय करत होते. ते माझ्या कामाने खूप प्रभावित झाले. त्यानंतर शशी कपूर इतरांसमोरही माझे कौतुक करू लागले आणि हा खूप चांगले काम करताे, असे सांगू लागले. ते इंडस्ट्रीत प्रत्येकाकडे माझ्या नावाची शिफारस करायचे. त्यानंतर त्यांनी “३६ चौरंगी लेन’ हा सिनेमा सुरू केला. हा सिनेमा अशोकजींसाठी सर्वात मोठा ब्रेक होता. या पहिल्याच सिनेमामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर अशोकजींनी मागे वळून पाहिलेच नाही. अपर्णा सेन, गिरीश कर्नाड, श्याम बेनेगल, जब्बार पटेल, शेखर कपूर, सुभाष घई, सतीश कौशिक यांच्यासारखे आर्ट फिल्मचे िदग्दर्शक असाे वा कमर्शियल सिनेमांचे दिग्दर्शक असो; अशोकजींनी सर्वांसोबत काम केले.

अशोकजी जितके उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर होते, तितकेच ते एक धाडसी माणूसही होते. असीम बजाजजींनी मला सांगितले होते की, ‘त्रिमूर्ती’ सिनेमाचे शूटिंग सुरू होते. डॉ. मोहन आगाशे त्यात खलनायक होते. त्यांच्यावरील एका दृश्याचा सेट लावण्यात आला होता. बऱ्याच वरती लाकडाचा एक फ्लोअर बनवला होता आणि त्यावर लायटिंग लावण्यात आले होते. जिथे लाइटचे सगळे स्विच बसवले होते, त्या जंक्शनवर अचानक आग लागली. हे पाहताच अशोकजींनी तत्काळ उडी मारली आणि केबल हातात धरून तिला लटकले, जेणेकरून ती त्या जंक्शनपासून तुटून वेगळी व्हावी. ही केबल जळाली असती, तर संपूर्ण सेटला आग लागली असती. केबलमध्ये करंट होता, पण जिथे आग लागली होती, तिथून ती वेगळी झाली. अशोकजी तारेला लटकून राहिले आणि लाइट बंद करा, असे ओरडत राहिले. जेव्हा जनरेटर बंद झाला आणि त्यावरचा विद्युतप्रवाह थांबला, तेव्हाच अशोकजी खाली उतरले.

असीमजींनी मला ‘खलनायक’च्या शूटिंगवेळी घडलेली घटनाही सांगितली होती. “चोली के पीछे क्या है’ या गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर सगळीकडे काचा लावल्या होत्या. सर्व दरवाजे – खिडक्या बंद होत्या. खिडक्यांच्या मागे निळे कापड लावले होते. सगळे जण कामात व्यस्त होते. अचानक अशोकजी धावू लागल्याचे सर्वांना दिसले. त्या कापडाला आग लागल्याचे कुणाच्या लक्षात आले नव्हते. खिडकी काचांनी बंदिस्त होती. अशोकजींनी अगदी सुपरमॅनसारखी झेप घेत आपले हॅट घातलेले डोके काचेवर आपटून काच तोडली आणि पलीकडे जाऊन पडले. लगेच ते कापड ओढून आग विझवू लागले, तेव्हा तिथे आग लागली होती हे सर्वांच्या लक्षात आले. अशोकजींच्या हिमतीची ही कहाणी एेकून मला शकील बदायूनींचा एक शेर आठवतोय…

चाहिए खुद पे यकीन – ऐ – कामिल

हौसला किसका बढ़ाता है कोई।

आम्ही ग्रीसच्या अथेन्समध्ये “चलते चलते’चे शूटिंग करत होतो. त्या लोकेशनजवळ काही बांगलादेशी लोक उभे होते. अशोकजी त्यांच्याशी बंगालीत बोलत असल्याचे मला दिसले. नंतर आम्ही काही खाण्यासाठी म्हणून चालतच तिथल्या एका गल्लीत गेलो. तिथे एका पठाणाचे कबाबचे दुकान होतो. अशोकजी त्याच्याशी पश्तूमध्ये बोलू लागले. त्यांच्या लाइट डिपार्टमेंटमध्ये एक मराठी सहकारी होता. ते त्याच्याशी मराठीत बोलायचे. मी एकदम अवाक् झालो. मी त्याबद्दल विचारल्यावर अशोकजी म्हणाले की, आपल्याला हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, पंजाबी, फारसी, पश्तूसह नऊ भाषा येतात. अशोकजी असे प्रतिभावान आणि हुशार होते. त्यांनी असे काम करुन ठेवले आहे की पुढच्या पिढ्याही त्यातून लायटिंग, अँगल शिकतील. आज त्यांच्या स्मरणार्थ, त्यांनी चित्रीत केलेल्या “चालबाज’मधील हे गाणे ऐका…

न जाने कहाँ से आयी थी,

न जाने कहाँ को जायेगी…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link