माझ्या हिश्श्याचे किस्से: जिसकी आवाज़ में सिलवट हो, निगाहों में शिकन ऐसी तस्वीर के टुकड़े नहीं जोड़ा करते…

0
16
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जिसकी आवाज़ में सिलवट हो, निगाहों में शिकन ऐसी तस्वीर के टुकड़े नहीं जोड़ा करते…


  • Marathi News
  • Opinion
  • Rumi Jafari On Amin Sayani Article | Divya Marathi Rasik Special Article Written By Rumi Jafri

रूमी जाफरी | बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमीन सयानी.

परवा मी जॅकी भगनानी आणि रकुलप्रीत यांच्या लग्नसोहळ्याचा आनंद घेत होतो, त्याचवेळी अमीन सयानी यांच्या निधनाची दु:खद बातमी एेकली. आज त्यांच्या आठवणीत मी कोणताही किस्सा सांगणार नाही. कारण किस्से त्यांच्याकडे होते, जे ते आपल्यासोबत खूप दूर घेऊन गेलेत. म्हणून आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी अमीन सयानी यांच्याबद्दल सांगणार आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश उर्दू अकादमी, भोपाळच्या जश्न-ए-उर्दू कार्यक्रमानंतर आकाशवाणीतील रूशदा जमील यांनी मला विचारले होते की, चांगल्या आवाजासाठी चांगली भाषा असणे किती आवश्यक आहे? तेव्हा मी त्यांना अमीन सयानी यांचे उदाहरण देत, भोपाळच्या श्याम मुन्शी यांचा एक किस्सा सांगितला होता… श्याम मुन्शीजी रेडिओ आणि नाटकांशी जोडले गेले होते, चांगले उद््घोषक होते. एका कार्यक्रमात एक तरूण अनाउन्स करताना अमीन सयानींच्या शैलीत, भाईयो और बहनो.. म्हणाला होता. तेव्हा श्यामभाईं त्या तरूणाला अमीन सयानी यांचे उदाहरण देत म्हणाले होते, “अमीन सयानी कधीच भाईयो और बहनो म्हणत नव्हते, तर ते नेहमी ‘बहनो और भाईयो म्हणायचे.’

तेव्हा या छोट्याशा उदाहरणाने मला अमीन सयानींच्या आवाजाच्या त्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली, जेव्हा प्रत्येक जण आतुरतेने बुधवारची वाट पाहायचा. मग संध्याकाळी सगळीकडे बिनाका गीतमालाच्या गाण्यांसोबत अमीन सयानी यांचा आवाज मनाला मंत्रमुग्ध करायचा. मी चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा सयानीजींशी तीन वेळा भेट झाली, तीसुद्धा चित्रपटांच्या पार्ट्यांमध्ये. १९९९ मध्ये आर. के. बॅनरसाठी मी ‘आ अब लौट चले’ची कथा लिहिली होती. ऋषी कपूर याचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाविषयी इंग्रजी पत्रकार अली पीटर जॉन मला भेटले. तेे “स्क्रीन’मध्ये एक कॉलम लिहायचे. त्या मुलाखतीदरम्यान मी जॉन यांना अमीन सयानींच्या ‘बहनो और भाईयो’बद्दल सांगितले, तर त्यांनी मला सयानीजींशी संबंधित बरेच किस्से सांगितले होते, जे सयानीजींनीच त्यांना त्यांच्या मुलाखतीवेळी सांगितले होते.

अमीन सयानी १९५१ मध्ये सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये बी. ए. करत होते, तेव्हा देव आनंद यांचे भाऊ विजय आनंदही तिथेच शिकत होते. ते नाटकांचे दिग्दर्शन करायचे. विजय आनंद यांच्या काही नाटकांमध्ये सयानीजींंनीही काम केले होते. १९५१ मध्येच रेडिओ सिलोनवर प्रसारक म्हणून त्यांना काम मिळाले होते. अमीन सयानी यांना पहिला ब्रेक अभिनेता मनमोहन कृष्ण यांच्या ‘ओव्हर लाइन फुलवारी’ या रेडिओ कार्यक्रमातून मिळाला होता. त्याचे निर्माते बालगोविंद श्रीवास्तव होते आणि अमीन यांचे भाऊ हमीद सयानी दिग्दर्शक होते. एकदा नेहमीचे उद््घोषक आले नाही, तेव्हा सयानींजींना संधी मिळाली होती. तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री बाळकृष्ण वासुदेव (बी. व्ही.) केसकर यांनी रेडिओवर चित्रपट संगीताला बंदी घातली होती. रेडिओ सिलोनने या संधीचा फायदा घेतला.

आता लोक आकाशवाणीऐवजी रेडिओ सिलोन ऐकू लागले. मग बिनाका गीतमाला हिट परेड कार्यक्रम सुरू झाला. सुरूवातीचे काही आठवडे हा कार्यक्रम इंग्रजीत हाेता. त्यावेळी सिलोनमध्ये फक्त ५ टक्के लोकांनाच हिंदी येत होती, परंतु बिनाका गीतमाला इतकी लोकप्रिय झाली की आशियातील प्रत्येक घरात ती ऐकली जाऊ लागली. गीतमालासाठी आठवड्याला ४०० पत्रे यायची. १९५२ मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम हिंदीत सादर झाला, तेव्हा पहिल्याच कार्यक्रमासाठी नऊ हजार पत्रे आली. रेडिओ सिलोनच्या या लोकप्रियतेमुळे भारत सरकारला जाग आली आणि रेडिओचे व्यावसायिकरण न केल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होतेय, हे लक्षात आले. २१ जुलै १९६९ रोजी विविध भारतीची व्यावसायिक सुरूवात झाल्यावर सर्वात पहिला व्यावसायिक कार्यक्रम ‘सेरिडॉन की दुनिया’ अमीन सयानी यांनीच सादर केला होता. बिनाका गीतमालाला आणखी आकर्षक बनवण्यासाठी सयानीजी चित्रपटांतील मान्यवरांच्या मुलाखतीही घ्यायचे.

किशोरकुमार हे सयानी यांचे चांगले मित्र होते. सयानीजींनी किशोरकुमारांची मुलाखतीसाठी वेळ घेतली, तेव्हा त्यांनी अंधेरीच्या मोहन स्टुडिओत बोलावले. सयानीजी कुलाब्याहून टॅक्सीने बी. के. दुबे यांच्यासोबत मुलाखत रेकार्ड करण्यासाठी गेले. पण, किशोरकुमार यांनी चित्रपटाच्या निर्मात्याला सांगून ठेवले होते की, अमीन सयानी गेल्यावर मला बोलवा. निर्मात्याने ही गोष्ट सयानींंना सांगितली. त्यांना याचे इतके वाईट वाटले की त्यांनी दुसऱ्या दिवशी किशोरकुमार यांना फोन करून, ‘आता कधीच तुमची मुलाखत घेणार नाही आणि सोबत कार्यक्रमही करणार नाही,’ असे सांगून टाकले. हे भांडण काही वर्ष सुरू राहिले. एक दिवस किशोरकुमार यांनी सयानीजींंना फोन केला आणि आपला नवा चित्रपट ‘बढ़ती का नाम दाढ़ी’चा रेडिओ कार्यक्रम करायचाय, असे सांगितले. त्यावेळी सयानीजी म्हणाले, ‘आधी तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल, तरच मी हा रेडिओ कार्यक्रम करेन.’ किशोरकुमारांनी पुन्हा एक अट घातली की, त्या मुलाखतीत तुम्ही माझी ओळख करून द्यायची नाही, तर शांत राहायचे.’ सयानींजींंनी ही अट मान्य केली आणि ती मुलाखत ४५ मिनिटे चालली.

सचिन देव बर्मन यांचे निधन झाले, तेव्हा अमीन सयानी यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, आर. डी. बर्मन, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी यांच्या मुलाखती घेतल्या. फक्त किशोरकुमार राहिले होते. सयानींनी विचार केला की, आधी वेळ घेतली तर किशोरदा गडबड करू शकतात. म्हणून ते वेळ न घेताच त्यांच्या बंगल्यावर गेले. एसडी बर्मन यांच्यावर किशोरकुमार ४५ मिनिटे बोलले. नंतर म्हणाले, ‘मी उद्या कुलाब्याला येऊन रेकॉर्डिंग करतो.’ सयानीजींना वाटले, किशोरकुमार त्यांना टाळत आहेत, पण किशोरदांंनी त्यांचे वचन पाळले. सलग दोन दिवस येऊन त्यांनी मुलाखत पूर्ण केली. या मुलाखतीत किशोरदांनी एसडी बर्मन यांच्यासोबतच्या आपल्या शेवटच्या गाण्याबद्दल सांगितले आहे. ते ‘मिली’(१९७५) चित्रपटातील होते. त्याचे बोल होते… बड़ी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी…

शकीला बानो भोपाली यांची मुलाखत घ्यायला सयानीजी गेले होते, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘आमचा दिवस रात्री सुरू होतो.’ त्यामुळे ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री शकीला बानोंच्या ‘शहर ए ग़ज़ल’ बंगल्यावर पोहोचले आणि त्यांच्या शेरोशायरीच्या मैफिलीत सहभागी होत पहाटे चारपर्यंत मुलाखत रेकॉर्ड केली. या किश्श्यांवरुन लक्षात येते की अमीन सयानी बनणे सोपे नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात ५४ हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजारांहून अधिक जिंगल रेकॉर्ड केल्या होत्या. आवाजाच्या दुनियेचा हा जादूगार आज आपल्यात नाही. पण, त्यांचा आवाज शतकानुशतके आपल्या हृदयात राहील. गुलजार यांच्या गझलेतील हा शेर कदाचित अशाच आवाजासाठी आहे…

जिसकी आवाज़ में सिलवट हो निगाहो में शिकन
ऐसी तस्वीर के टुकड़े नही जोड़ा करते
“छोटीसी बात’मधील हे गाणं आठवतंय, ज्यात आयुष्याच्या तत्त्वज्ञानासोबत सत्यही कथन केले आहे. तुम्हीही ते नक्की ऐका…
ना जाने क्यो होता है यह ज़िन्दगी के साथ
अचानक ये मन, किसी के जाने के बाद,
करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link