
स्वप्नील जोशी11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
काश्मीर खोरं नक्की आहे तरी कसं? तिथल्या माणसांच्या आयुष्यात सतत काहीतरी धुमसतंय. त्यातून येणारं विस्थापन, अस्तित्व नाकारण्यासाठी, ओळख लपवण्यासाठी होणारी होरपळ आणि त्यातून वाट्याला येणारा एकाकीपणा.. या सगळ्यांचं यथार्थ दर्शन ‘रूह’मधून घडतं. मराठीसह अन्य भारतीय भाषांतील समकालीन कसदार पुस्तकांची ओळख करुन देणारे हे पाक्षिक सदर…
आपण पाहतो ते आताचे काश्मीर आणि अद्याप आपल्यापर्यंत न पोहोचलेलं खोरं यात किती ‘अंतर’ आहे, याचे प्रत्यंतर मानव कौल यांच्या ‘रूह’ या पुस्तकातून वाचकाला येतो. ‘न दिसणाऱ्या कित्येक कथा-कहाण्या वाट पाहात असतात, असे वाटून मी अपेक्षेने या अंधारामागे धावत असतो,’ असं कौल एके ठिकाणी सांगतात. आपण जगलेले आयुष्य पुन्हा नव्याने अनुभवण्यासाठी काहीसं उत्सुक असलेलं त्यांचं मन आपल्याशी मुक्तपणे संवाद साधतं. आपण जे आयुष्य जगतो, त्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे काश्मीरच्या प्रवासातील अनुभवांबद्दल ते म्हणतात की, माझ्या भूतकाळापासून लांब पळायचा मी जेवढा प्रयत्न करत होतो, तेवढाच त्याच्याकडे खेचला जात होतो.
लहानपणी श्रीनगरमध्ये राहात असताना, बेकरीतून लवास घेऊन येणे, कंदूर भट्टीजवळची ती उबदार माणसं, आईने केलेला गरमगरम चहा आणि लवास कधी मिळेल, याची वाट पाहात फेरन घानून बसलेले बाबा.. हे सगळं त्यांना लख्ख आठवतं. हा लेखन प्रवास लिहिताना त्यांच्या मनाच्या तळाशी कितीतरी गोष्टी एकाच वेळी फेर धरत. एकेकाळी जे पहिले होते, ज्याचा गंध अनुभवला होता, ज्याचा स्वाद घेतला होता, त्याबद्दल लिहिता लिहिता त्यांचे मन आणि पावलं त्यांना अनंतनागपासून ख्वाजाबागेपर्यंत त्यांच्या मूळ घरापर्यंत घेऊन जातात. लहानपणी काश्मीर सोडून मध्य प्रदेशात येणं ही लेखकाच्या आयुष्यातील ही एक महत्त्वाची घटना असली, तरी ‘आपण पुन्हा कधी तरी तेथे परत जाऊ,’ हा विश्वास त्यांच्या मनात होता. काश्मीरमधील आपल्या घराजवळ पोहोचताच तेथून बाबांना केलेला फोन, त्यांच्यातला दोन – तीन वाक्यांचा संवाद, ‘रुह’ची सोबत.. हे सगळं वाचताना मन हरखून जातं. जात, धर्म, लिंग या सगळ्यांच्या संकुचित सीमा ओलांडून मानवतेचे आणि माणसांच्या भोळ्या चेहऱ्याआड लपलेल्या अमानवी प्रवृत्तीचे दर्शनही लेखक आपल्याला करून देतो.
संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आपल्याला ‘रूह’ या शीर्षकामागे असलेली लेखकाची मनोभूमिका कळते. हा सगळा लेखनप्रपंच ‘रूह’च्या अमेरिकेतील भेटीतच निश्चित झाला होता. तिने दिलेले आव्हान पूर्ण करताना, आपण काश्मीरचा प्रवास कसा केला हे कथन करतानाच, तिथे भेटलेल्या प्रत्येक पात्राची स्वतंत्र गोष्ट कौल आपल्याला सांगतात. ‘खोऱ्यामध्ये आता परिस्थिती ठीक आहे, या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? हे आपल्याला अद्यापपर्यंत कळलेले नाही. खोऱ्यात पर्यटक आले की, तिथले लोक आपला थकवा पोत्यात भरून दल सरोवरात बुडवून टाकतात,” या त्यांच्या वाक्यातून वास्तवातील परिस्थितीचा अंदाज येतो.
काश्मीर हाच विषय केंद्रस्थानी ठेवून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. मानव कौल यांचे काश्मीरबद्दलचे विचार, स्वतःशी झालेले संवाद पुस्तकात सुसूत्रपणे एकत्रित उतरले आहेत. काश्मीर खोऱ्यातील स्वर्गीय आनंद देणारा निसर्ग आणि त्याचे वर्णन करताना लेखकाने सफरचंदाचे झाड, धुक्यात हरवलेली वाट, तेथील खाद्यसंस्कृती, घरांची रचना हा सगळा भाग चित्रमय स्वरुपात आपल्यासमोर उभा केला आहे. काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि दहशतीचे सावट या सामाजिक प्रश्नाच्या मुळाशीही आपण येऊन पोहोचतो. लेखकाच्या नजरेतून मुक्तपणे वाहणारी झेलम नकळत आपली होते. आपल्या प्रवासाचे, वर्तुळ पूर्ण होत असताना सोबत वडील नसण्याची खंत लेखकाने कवितेतूनच फार सुंदरपणे मांडली आहे.
या पुस्तकातील आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबी पूर्णपणे एकरूप झाल्या आहेत. पुस्तकाच्या मध्यावर आल्यावर वाचकांना जाणीव होते की, अरे, अजून बरंचसं काश्मीर आपल्याला समजून घ्यायचंय! नीता कुलकर्णी यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद मूळ पुस्तकाइतकाच या विषयामध्ये गुंतवून ठेवणारा आहे. कोणताही विशिष्ट दृष्टिकोन अथवा धारणा न ठेवता, काश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची ही हळवी कथा एक वाचक म्हणून प्रत्येकाने वाचावी अशी आहे.
– पुस्तकाचे नाव : रूह
– लेखक : मानव कौल
– अनुवाद : नीता कुलकर्णी
– प्रकाशक : रोहन प्रकाशन
– पाने : २००, किंमत : २९५ रु.
(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)