
आदूबाळ4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मनोहर माळगांवकर
महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमाप्रश्नावरून वाद कितीही असला, तरी दोन्ही प्रदेशांमध्ये आपुलकीचे धागेही चिकार आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे पुण्यात शिकले. राम गणेश गडकरींशी त्यांची मैत्री होती. भारतरत्न भीमसेन जोशी मूळचे गदगचे आणि नंतर पुण्यात राहिले. याच प्रभावळीतील एक प्रतिभावंत म्हणजे इंग्रजीतून लिहिणारे महत्त्वाचे भारतीय लेखक मनोहर माळगांवकर.
माळगांवकरांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील जगलबेट गावचा. आज हा परिसर निसर्गरम्य दांडेली अभयारण्याजवळ आहे. त्यांचा परिवार बऱ्यापैकी उच्चभ्रू होता. ते स्वतः संस्थानिक नसले, तरी त्यांच्या पूर्वजांचे अनेक संस्थानिकांशी जवळचे संबंध होते. बेळगाव आणि धारवाडमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी १९३५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. काही काळ त्यांनी चक्क व्यावसायिक शिकारी म्हणून काम केलं. पुढे चार वर्षे
माळगांवकरांनी केंद्र सरकारच्या सेवेत सनदी अधिकारी म्हणून काढली आणि दुसरं महायुद्ध ऐन भरात असताना १९४२ मध्ये त्यांनी मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये अधिकारी म्हणून प्रवेश केला. दहा वर्षे ते लष्करात होते. लष्करी अधिकारी म्हणून ते अत्यंत यशस्वी ठरले, असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी त्या अल्पावधीतच लेफ्टनंट कर्नलपदापर्यंत मजल मारली. १९५२ मध्ये त्यांनी लष्कर सोडून खाणकामाचा व्यवसाय सुरू केला. १९५७ मध्ये ते राजकारणात पडले आणि निवडणूक हरले. त्यांच्या लेखनाला खरी सुरूवात इथून – म्हणजे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी झाली.
माळगावकरांच्या आयुष्याची ही कोरडी जंत्री नाही. त्यांचं कादंबरीलेखन अनुभवांतून सिद्ध झालेलं होतं. संस्थानी राजवटीवर आधारलेली ‘प्रिन्सेस’ ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजली. लष्करी अनुभवांवर बेतलेल्या ‘डिस्टंट ड्रम’ कादंबरीत वेगळ्या, पण ओळखू येईल अशा नावाने आलेली मराठा लाइट इन्फन्ट्री आहे आणि कादंबरीचा नायक ते स्वतःच आहेत, हे ओळखायला फारसे श्रम पडत नाहीत. ‘आपल्या अनुभवांबाहेरचं काही लेखकानं लिहिल्यास तो खोटारडा आहे, असं म्हणावं लागेल,’ असं ते एका ठिकाणी म्हणाले होते. याच कारणामुळे माळगांवकर हे इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक असले, तरी त्यांच्या लेखनातून दिसणारा भारत त्यांच्या अनुभवातील, म्हणजे उच्चभ्रू आहे. अनेक टीकाकारांनी त्यांच्या वर्गवादी दृष्टिकोनावर टीका केली आहे. माळगांवकरांचे संस्थानिक खरे वाटतात; पण सामान्य माणूस रंगवताना ते जाड फटकाऱ्यांनी त्यांना रंगवतात, ही गोष्ट खरीच आहे.
त्यांच्या विपुल लेखनापैकी दोन पुस्तकांकडे प्रामुख्याने लक्ष वेधावंसं वाटतं. त्यातली पहिली कादंबरी आहे – ‘द बेंड इन द गँजेस’. स्वातंत्र्य चळवळ, फाळणी आणि नंतरच्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी मूलभूत प्रश्नांचा वेध घेते. हिंसा आणि अहिंसेचा तुलनात्मक पट आपल्या पात्रांच्या माध्यमातून माळगांवकर रंगवतात. स्वातंत्र्यासाठी चळवळ करायची तारुण्यसुलभ इच्छा हिंसेच्या मार्गाकडे कशी आकर्षित करते आणि त्यातून हळूहळू धार्मिक विद्वेषाकडे कशी वाटचाल होते, याचं चित्र कदाचित आजच्या घडीला जास्त समर्पक वाटेल. माळगांवकर या कथानकाच्या माध्यमातून गांधीवादाच्या अहिंसेच्या तत्त्वांची मुळापासून छाननी करतात. जनता उन्मादात असली की, हिंसाचार कोणालाच सोडत नाही – मग तो गांधीवादी ‘ग्यान’ असो किंवा क्रांतिकारक ‘देबी दयाल’. या वणव्यात अहिंसा ‘तत्त्वज्ञांचं एक पवित्र स्वप्न बनून राहतं,’ असं माळगांवकर नोंदवतात. कादंबरीचा अंतिम संदेश सुस्पष्ट आहे – ‘आतून’ वाटल्याशिवाय अहिंसा निरर्थक आहे. माळगांवकर म. गांधींचा शोध घेत राहिले. गांधीहत्येचा शोध घेणारं ‘द मेन हू किल्ड गांधी’ या रिपोर्ताज शैलीतील पुस्तकात माळगांवकर इतिहास संशोधकाच्या रूपात भेटतात. मूळ कागदपत्रांच्या, दस्तावेजांच्या आणि छायाचित्रांच्या आधारे लिहिलेलं हे पुस्तक चक्क एखाद्या कादंबरीप्रमाणे भासतं. असं असलं, तरी माळगांवकरांवर भरपूर टीका झालेली आहे. इंग्रजीतून लिहिणाऱ्या समकालीन भारतीय लेखकांच्या पहिल्या रांगेत आर. के. नारायण, मुल्कराज आनंद, राजा राव प्रभृती आहेत, माळगांवकर नाहीत. उच्चभ्रूवादी (एलिटिस्ट) असल्याचा आणि पुरेसं ‘भारतीयत्व’ नसण्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. तो फारसा निराधार आहे, असं नाही. ‘टू लीव्हज् अँड अ बड’ या प्रसिद्ध कथेत मुल्कराज आनंद चहामळ्यातल्या मजुराचं खडतर आयुष्य जवळून मांडतात. अशाच चहामळ्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या ‘कॉम्बॅट ऑफ शॅडोज’ या कादंबरीत माळगांवकरांचा फोकस मात्र एका इंग्रज मळेवाल्याच्या नैतिक अधःपतनावर राहतो. तथापि, माळगांवकर ज्या काळाबद्दल लिहीत होते, त्यात राजकीय आणि सांस्कृतिक घुसळण फार वेगाने झाली. त्याचं चित्र पाहायचं असेल, तर या लेखकाचं साहित्य जरूर वाचलं पाहिजे.
(संपर्कः aadubaal@gmail.com)






